एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांची फसवणूक करणाऱ्या हिस्ट्री शीटरला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांच्या अ‍ॅक्टिव्ह कार्डची अदलाबदल करून (swapping ATM cards) नंतर त्याच्या आधारे पैसे काढणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police) सोमवारी अटक केली आहे. २८ ऑक्टोबर रोजी एका महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

साकीनाका, जरीमरी भागातील एटीएममध्ये तक्रारदार महिला पैसे काढत असताना एक व्यक्ती तिला पैसे काढण्यास मदत करण्यासाठी तिच्याकडे आला. तो मदत करत असल्याने महिलेने तिचे एटीएम कार्ड (ATM Card) आणि चार अंकी पासवर्डही (Password) त्याला दिला. काहीच क्षणात बँकेचा सर्व्हर डाऊन असल्याने व्यवहार शक्य नसल्याची सबब सांगून त्याने कार्ड दिले आणि तो निघून गेला.

काही वेळाने तिला एक संदेश प्राप्त होताच महिला चांगलीच घाबरली. तिच्या खात्यातून ४१,७४१ रुपये डेबिट झाल्याचा बँकेकडून आलेला तो संदेश होता. त्यानंतर तिने तिचे कार्ड तपासल्यावर तिच्या लक्षात आले की ते वेगळेच आहे. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तिने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

एटीएममधून आणि परिसरातून मिळालेल्या क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) फुटेजच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.

“पैसे काढल्यानंतर आरोपी दागिने घेण्यासाठी एका दागिन्यांच्या दुकानात गेल्याची माहिती समोर आली होती,” असे पोलिसांनी सांगितले.

अशाच पद्धतीनं डीएन नगर, अंधेरी, भायखळा आणि मालवणी येथे देखील फसवणुकीच्या घटना घडल्याचे तपासात समोर आले होते. त्या अनुषंगाने तपास करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि खबऱ्याच्या मदतीने या गुन्ह्यात साहिल सलीम शेख याचा सहभाग समोर आला होता. त्याचे डोंबिवलीत आणि विद्याविहार अशा दोन ठिकाणांची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही ठिकाणी पाळत ठेवून पोलिसांनी त्याला विद्याविहार येथून ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याजवळ पोलिसांना ४४ एटीएम कार्ड मिळून आले आहेत. खार, धारावी, माहीम, कुर्ला, घाटकोपर आणि सायन भागात तो सहसा अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा प्रयत्न करतो, अशी कबुलीही त्याने पोलीस चौकशीत दिली.

भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ (न्यासभंगाबद्दल शिक्षा) आणि ४२० (फसवणूक आणि मालमत्तेची सुपूर्दगी करण्यास अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करणे) अन्वये दाखल गुन्ह्यात शेख याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!