बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून आरटीजीएस फॉर्म बदलल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police) एका ४० वर्षीय व्यक्तीला राष्ट्रीयीकृत बँकांच्या (Nationalise Bank) ड्रॉप बॉक्समधील चेकला जोडलेले आरटीजीएस (रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट – RTGS) फॉर्म बदलुन पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतर (transfer) करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अन्वर खान असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात आंबोली (Amboli) आणि जोगेश्वरी (Jogeshwari) पोलीस ठाण्यात (Police Station) सुद्धा अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका राष्ट्रीयीकृत बँकेचा ड्रॉप बॉक्स उघडून चेकला जोडलेला आरटीजीएस फॉर्म बदलून दुसरा खाते क्रमांक असलेला फॉर्म जोडून पैसे त्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले होते. यासाठी त्याने चेकवरील चिन्हाशी जुळणारी फॉर्मवरील स्वाक्षरी कार्बोनाइज केली होती. बँकेच्या कोणत्याही कर्मचार्‍यांच्या लक्षात न येता त्याने गुन्हा केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये संदेश प्रसारित करून आरोपीला शोधून काढले आहे.

अंधेरी येथील एका अभियांत्रिकी कंपनीने त्यांच्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी RTGS फॉर्मसह बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये ₹३५ लाखांचा चेक टाकला होता. मात्र त्यांच्या खात्यातून ₹३५ लाख हस्तांतरित होण्याऐवजी केवळ ₹३ लाख डेबिट करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने याबाबत बँकेत चौकशी केली असता प्रकरण समोर येताच १२ जानेवारी रोजी त्यांनी साकीनाका पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी यासंदर्भात बँक कर्मचाऱ्यांची चौकशी करून आरटीजीएस फॉर्म तपासला असता त्यावर लिहिलेला खाते क्रमांक तक्रारदाराच्या खाते क्रमांकापेक्षा वेगळा असल्याचे आढळून आले. सदर खाते हे येस बँकेतील कोटन्यागा भूषण या नावावर होते. जे खोटे असल्याचे आढळून आले.

“बँकेचे सीसीटीव्ही तपासले असता १२ जानेवारी रोजी दुपारी एक व्यक्ती ड्रॉप बॉक्स उघडताना आम्हाला दिसला. तो माणूस आत चेक टाकण्याऐवजी फॉर्मशी जोडलेला चेक काढताना आढळला. त्या व्यक्तीने बँक सुरु असताना बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या काहीच लक्षात न येत हे कृत्य केले होते” असे यासंदर्भात बोलताना साकीनाका पोलीस म्हणाले.

आरोपीचा शोध सुरु असताना तो आंबोली परिसरात दिसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून बनावट दस्तावेज तयार करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत त्याला अटक केली.

आंबोली आणि जोगेश्वरी पोलिस ठाण्यातही खान याच्या विरोधात अशाच गुन्ह्यांची नोंद असल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले.

खानचा एक साथीदार असल्याची माहिती समोर येत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बँक कर्मचार्‍यांची देखील चौकशी सुरु असून, कोणी बँक कर्मचारी या प्रकरणात सहभागी आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!