अडीच वर्षाच्या मुलीच्या अपहरणकर्त्याला साकीनाका पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या

अपहरणकर्ता मुलीला घेवून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज

शुक्रवारी संध्याकाळी साकीनाका येथे आपल्या वडिलांच्या मिठाई दुकानाबाहेर खेळत असणाऱ्या, अडीच वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या २८ वर्षीय इसमाचा साकीनाका पोलिसांनी सहा तासाच्या आत पत्ता लावत बेड्या ठोकल्या आहेत. संदिप शशिकांत परब असे अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव आहे.

अडीच वर्षीय शिरीन फातिमा शुक्रवारी संध्याकाळी ३.२५ वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या मिठाईच्या दुकानाबाहेर खेळत होती. “ती अचानक दिसायची बंद झाली म्हणून दुकानाबाहेर येवून पाहिले असता ती कुठेच आढळून आली नाही” असे शिरीनचे वडिल बरकत अली यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.

परिवारातील मंडळी, मित्र आणि आसपासच्या दुकानदारांच्या मदतीने तिचा परिसरात शोध घेतला मात्र ती कुठेच आढळून आली नसल्यामुळे, अखेर त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

“तक्रार नोंद होत असतानाच आम्ही वेगवेगळ्या टिम बनवून परिसरातील सिसिटीव्हीच्या आधारे शोध सुरु केला होता” असे याबाबत बोलताना साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

“सिसिटीव्ही फुटेजमध्ये मुलीला रोडवर चालणारा एक इसम उचलून घेवून जात असल्याचे दिसत होते. आम्ही त्याचा फोटो खबरयांना दाखवला असता अपहरणकर्त्याची काही तासातच माहिती आमच्या हाती लागली. ज्याच्या आधारावर आम्ही असल्फा येथून संदिप परब या अपहरणकर्त्याला अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली” असे तपासी अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले.

मुलीच्या अपहरण करण्यापाठीमागे अपहरणकर्त्याचा उद्देश स्पष्ट झाला नसून, साकीनाका पोलीस त्याबाबत तपास करत आहेत.

मुलीला काही तासातच सुखरूप घरी परतवल्याबद्दल मुलीच्या पालकांनी साकीनाका पोलिसांचे विशेष आभार मानले. साकीनाका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल मुंबईभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

, , , , , , , , , ,

2 Responses to अडीच वर्षाच्या मुलीच्या अपहरणकर्त्याला साकीनाका पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या

  1. Sagar Yelnure March 12, 2018 at 6:01 pm #

    Great Job…. Mumbai Police

  2. Vikram Budhavale March 12, 2018 at 6:00 pm #

    Great work

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes