संघर्षनगरमध्ये सुरुवातीच्या पावसातच गटारे भरली, घाण रस्त्यांवर; नालेसफाईचा फोलपणा उघड

उशिराने आगमन झालेल्या पावसाने सुरुवातीच्या दिवसातच मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या नालेसफाईचा फोलपणा उघड केला आहे. या सुरुवातीच्या पावसात चांदिवली, संघर्षनगर येथे सर्व ठिकाणी पाणी तुंबले होते. येथील अनेक गटारे सफाई न झाल्यामुळे पाण्याने भरून यातील सगळी घाण रस्त्यांवर आल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मार्केटमध्ये संपूर्ण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याने आणि दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

इमारतीच्या पाठीमागील डोंगराच्या जवळील भागात कचराकुंड्या बनवण्यात आलेल्या आहेत. अनेक टाकावू वस्तु आणि कचरा तेथे टाकला जातो. अनेक ठिकाणी गटारांमध्ये सुद्धा कचरा टाकला गेला आहे. हा सगळा कचरा पावसाच्या पाण्यासोबत संपूर्ण रस्त्यावर येवून पसरला आहे, असे याबाबत बोलताना इमारत क्रमांक वीस मधील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

सुरुवातीच्या पावसानेच संघर्षनगरची चांगलीच दुरावस्था केली आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी व मुरुम चक्क अस्ताव्यस्त होऊन खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. पावसाचे पाणी गटारीतून कमी आणि रस्त्यावरूनच जास्त वाहत आहे, त्यातच गटारे तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याची भर पडली आहे. या घाण पाण्यातून वाट काढताना खड्डे चुकविण्याची कसरत वाहनचालकांना व शालेय विद्यार्थ्यांना करावी लागत आहे.

“आम्ही संघर्ष करून आपली घरे मिळवली खरी, मात्र आमचा संघर्ष अजून संपलेला नाही. पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व साधारण सुविधांपासून सुद्धा आम्ही गेल्या दशकापासून वंचित आहोत. येथून लोकप्रतिनिधी निवडून तर येत आहेत, मात्र एक निवडणुक ते दुसरी निवडणूक असाच त्यांचा चेहरा पहायला मिळतो. इतर वेळी लोकांच्या समस्या जाणून घेताना ते कधीच आढळून येत नाहीत,” असेही याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “अनेक वेळा पावसाळा नसताना सुद्धा येथील गटारे आणि संडासची घाण वाहून नेणाऱ्या वाहिन्या भरून सगळी घाण रस्त्यावर पसरलेली असते. याबाबत स्थानिक प्रतिनिधीना तक्रार केली तर ते आम्हाला लिखित स्वरुपात तक्रार करा असे सांगतात. मग या लोकप्रतिनिधींचा उपयोगच तो काय?”

उंच भागाकडून सखल भागाकडे येथील इमारतींचे बांधकाम असल्या कारणाने, प्रत्येक पावसाळ्यात डोंगराकडून सखल भागात रस्त्याने पावसाचे पाणी वाहते. पुढे खड्यात आणि मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहते. परिसरात रस्त्यावर नदी अवतरल्याचे दृश्य पावसाच्या काळात असते. यंदाही सलग पडलेल्या पावसात हे चित्र कायम होते. मात्र गटारांची सफाई न झाल्याने, गटारी तुंबल्याने त्यातील काळे पाणी पावसाच्या पाण्याबरोबर मिसळून रस्त्यांना गटारांचे स्वरूप प्राप्त झाले होते.

“मार्केट भागातच कचराकुंडी आहे. मात्र तेथील कचरा व्यवस्थित उचलला जात नसल्याने संपूर्ण पावसाळा तिथे घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. पावसाने कचरा ओला होऊन परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिक येथे खरेदीसाठी येण्यास टाळतात आणि याचा आमच्या धंद्यावर परिणाम होतो,” असे याबाबत बोलताना काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , , ,

2 Responses to संघर्षनगरमध्ये सुरुवातीच्या पावसातच गटारे भरली, घाण रस्त्यांवर; नालेसफाईचा फोलपणा उघड

  1. Sahebrao Mahale July 8, 2019 at 6:03 pm #

    नगरसेविका गायब आहे त्यांना काही घेणं देणं नाही आहे संघर्ष नगर मध्ये ते फक्त निवडणूक अली की जागे होतात कोण मेल कोण नाही काही नाही फरक त्यांना आणि जरी आले ना तर फक्त संघर्ष नगर बघणार बाकीचा परिसर नाही त्यांना माहीत पण नसेल की भारत नगर मध्ये गरिबांचे झोपडे पडलेले कारण त्यांना इथून वोट नाही मिळत ना किव्हा मिळत ही असतील पण किती 20 ते 30 खरी वोटिंग तर संघर्ष नगर मध्ये आहे तिथे तरी यायला पाहिजे ना

  2. Prasad Jalgaonkar July 8, 2019 at 6:02 pm #

    Chor ahe na corporator.. Ajun kaay pahije?

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!