संघर्षनगरमध्ये भूस्खलन; २ इमारती केल्या खाली

संघर्षनगर इमारत क्रमांक ९ जवळ आज संध्याकाळी जमीन आणि रस्ता धसून बराचसा भाग बाजूलाच सुरु असणाऱ्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडला. बांधकाम बंद असल्याने जिवित हानी टळली आहे. अग्निशमन दल आणि साकीनाका पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून परिसरातील वाहतूक आणि वर्दळ यावर बंदी घालत सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. घटनास्थळा शेजारच्या इमारतींना असणारा धोका पाहता इमारत क्रमांक ९ मधील २ विंग्स रिकाम्या करण्यात आल्या असून, त्यातील रहिवाशांना तात्पुरते जवळच असणाऱ्या कम्युनिटी हॉलमध्ये हलवण्यात आले आहे.

पवई पाठोपाठ आता चांदिवलीचा विकासाची गती सुद्धा वाढली आहे. अनेक नामवंत विकासकांच्या इमारती या परिसरात येत आहेत. सोबतच मुंबईतील कांदिवली, बोरवली, मलाड अशा भागात झोपडपट्टीत राहणाऱ्या असणाऱ्या अनेक कुठुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. याच पुनर्वसन करण्यात आलेल्या इमारत क्रमांक ९ समोर भूस्खलनाने आज रस्ता आणि जमीन धसून शेजारीच सुरु असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी पडल्याचा प्रकार घडला.

यथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, “संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास काहीतरी फुटावे असा जोरदार आवाज झाला होता. नक्की काय घडले हे पाहण्यासाठी रहिवाशांनी रस्त्याकडे धाव घेतली असता इमारतीच्या समोरील रस्त्याला एक भेग पडलेली होती. काही काळच लोटला असेल आणि पुन्हा तसाच आवाज झाला आणि क्षणातच भूस्खलन होत रस्ता, नाल्याचा काही भाग आणि शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या सुरक्षेसाठी लावलेले पत्रे हे सर्व बांधकाम सुरु असणाऱ्या भागात कोसळले”

“शेजारी बांधकाम सुरु असणारा विकासक हा दिवसातून अनेक वेळा सुरुंग लावून तेथील दगड फोडण्याचे काम करत असतो त्यामुळे आमच्या घरांना तडे जात असून, आमच्या इमारतींना धोका असल्याबाबतच्या तक्रारी आम्ही वारंवार पालिकेकडे केल्या आहेत. मात्र पालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केले होते आणि त्यामुळे आजचा हा अपघात घडला. आज कोणत्याही प्रकरची जीवित हानी घडली नसली तरी याच मार्गे परिसरात येणाऱ्या वाहनांची आणि लोकांची आवजावी असते त्यामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता.” असेही यावेळी बोलताना काही स्थानिकांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहचलेल्या अग्निशमन दल आणि साकीनाका पोलिसांनी आसपासच्या इमारती खाली करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

स्थानिक आमदार नसीम खान यांच्यासह नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घटनास्थळाला भेट देत यास जबाबदार व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!