१० वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शाळेच्या बस ड्रायव्हरला अटक

पवईतील एका प्रतिष्ठित शाळेच्या १० वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी त्याच शाळेच्या ३५ वर्षीय बस चालकाला अटक केली आहे. शाळेने याबाबत तक्रार दाखल करताच पवई पोलिसांनी कारवाई केली. मात्र पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी सुरुवातीला तिचा जवाब नोंदवण्यास विरोध दर्शवला होता.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस घटना घडली होती. आरोपी शालेय बसचा चालक असून, पीडित त्याच बसने शाळेत येत-जात असे. ‘घटनेच्या दिवशी विद्यार्थिनी बसच्या पुढील भागात आरोपीजवळ उभी होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसमध्ये, त्याने तिला अयोग्य स्पर्श करत अश्लील वर्तन केले होते.’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, ‘याबाबत विद्यार्थिनीने लगेच शाळेत बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांना तात्काळ याबाबत तक्रार केली. शिक्षकांनी शालेय प्रशासनाला याबाबत माहिती देताच त्यांनी बस ड्रायव्हरला पवई पोलीस ठाण्यात हजर करत तक्रार दाखल केली.’

‘शाळा प्रशासनाने तक्रार दाखल करून आपले कर्तव्य पार पाडले होते, मात्र सुरुवातीला याचा पाठपुरावा करण्यास विद्यार्थिनीच्या पालकांनी नकार दर्शवत तिला जवाब नोंदवण्यास पाठवण्यास विरोध दर्शवला होता.’ असेही याबाबत बोलताना अजून एका अधिकाऱ्याने सांगितले.

पवई पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३७६ (बलात्कारची शिक्षा) आणि शिक्षकांनी दिलेल्या जवाबाच्या आधारावर मुलांवर लैंगिक अत्याचार (पोक्सो) प्रतिबंधक कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. परंतु या गुन्ह्यात विद्यार्थिनीचा जवाब सर्वात जास्त महत्वाचा होता.

या प्रकरणी चौकशी करणाऱ्या पथकाने पालकांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांच्या परवानगीने आणि कायद्याच्या चौकटीत राहत विद्यार्थिनीचे समुपदेशन करून तिचा जवाब नोंदवून घेतला.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!