दारू पडली महागात

प्रातिनिधिक छायाचित्र

ऑनलाईन दारू मागवणे पवईतील एका वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन दारू मागवणाऱ्या वृद्धाच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. फिर्यादी वृद्ध हे पवईत राहत असून, एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. फसवणूक प्रकरणी पवई पोलीस गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.

टाळेबंदीमुळे होमडिलिव्हरीच चालू असल्याने फिर्यादी यांनी घरी दारू मागवण्यासाठी आपल्या जवळील दुकानाचा ऑनलाईन नंबर सर्च केला होता. तिथे मिळालेल्या एका नंबरवर त्यांनी फोन लावून आपली ऑर्डर दिली. यावेळी समोरील व्यक्तीने आत्ताच पैसे द्यावे लागतील असे त्यांना सांगितले. फिर्यादी यांनीही ८ हजार रुपये पाठवले.

पैसे पाठवल्यावर ठगाने नोंदणीसाठी कोड आवश्यक असल्याचे सांगत एक कोड पाठवला. त्या कोडबद्दल तक्रारदार यांना शंका आल्याने त्यांनी ऑनलाईन पाठवलेले पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी ठगाने पैसे परत करत असल्याचे सांगत तक्रारदार यांच्या मोबाईलवर एक कोड पाठवला.

रक्कम परत मिळेल या आशेने तक्रारदार यांनी कोड पाठवताच त्यांच्या खात्यातून ९६ हजार रुपये काढले गेल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!