शाब्बास पवई पोलीस: पवईतील सगळ्यात मोठ्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

प्रमोद चव्हाण  | केवळ एक धूसर सीसीटीव्ही फुटेज व्यतिरिक्त इतर कोणताच पुरावा हातात नसतानाही प्रयत्नाची पराकाष्टा करत पवई पोलिसांनी पवईतील लेक फ्रंट सॉलिटीअर इमारतीत पाईपच्या साहाय्याने चढत २७ लाखाच्या मौल्यवान वस्तू, दागिने चोरी करणाऱ्या स्पायडर चोराच्या २० दिवसाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता १९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

For English Version Click Here

कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल झाले असले तरी अजूनही काही लोक घराबाहेर निघणे टाळत आहेत. अनेक मुंबईकर आपल्या गावी गेले आहेत. याचाच फायदा घेत चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे.

स्पायडर चोराचा डल्ला

पवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली होती. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने २७ लाख किंमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला होता. विशेष म्हणजे घरात लोक असताना चोरट्याने हा डाव साधला होता. याच इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये सुद्धा चोरट्याने प्रवेश केला होता, मात्र तिथून तो काहीच चोरी करू शकला नव्हता.

“कोणताही दरवाजा उचकटल्याशिवाय घरात प्रवेश करत चोरी केली असल्याचे समोर आले होते. रात्री २.३० नंतर सकाळी ७ वाजण्यापूर्वी चोरट्याने आपला डाव साधलेला होता. विशेष म्हणजे यावेळी घरातील सर्व व्यक्ती बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या”, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यामुळे गुन्हे शाखा सुद्धा याचा समांतर तपास करत होती.

“चोरट्याने पाईपच्या साहाय्याने वर चढत कबुतराची जाळी कापून खिडकीतून किचनमार्गे घरात प्रवेश केला होता. संपूर्ण फ्लॅटमधील लोकांचा अंदाज घेत ज्या रूममध्ये कोणीच नाही तिथे चोरट्याने कपाटात ठेवलेले सोने आणि हिऱ्याचे दागिने पळवले होते” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे दिलीप धामुनसे, आमचे दोन्ही गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महामुनी, पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड आणि गुन्हे प्रकटीकरण पथक आरोपीची माहिती मिळवण्यासाठी काम करत होते,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

खबऱ्याचे जाळे आले कामी

तपासात पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले होते, ज्यात आरोपी इमारतीची सुरक्षा भिंत चढून पाईपवर चढताना दिसत होता. मात्र हे सीसीटीव्ही फुटेज तितकेसे स्पष्ट नव्हते. पोलिसांनी सगळ्या खबऱ्याचे जाळे कार्यरत करत त्या फुटेजशी मिळणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला होता. सोबतच टेक्निकल माहिती सुद्धा मिळवली जात होती.

“आमच्या एका खास खबऱ्याने त्या फुटेजशी मिळणारा व्यक्ती नालासोपारा हद्दीत असल्याची माहिती दिली होती. त्याच्यावर पाळत ठेवत आम्ही त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

अजय विश्वकर्मा असे या अटक आरोपीचे नाव असून, नालासोपारा येथून त्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. “सध्या त्याच्याकडे चौकशी सुरु असून, गुन्ह्यात चोरी केलेल्या मालमत्तेची रिकव्हरी सुरु आहे.” असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“गुन्ह्याच्या आधी एक ते दोन वेळा आरोपी विश्वकर्मा हा पवई तलाव भागात नशेच्या पदार्थांचे  सेवन करण्यासाठी आला होता. चोरीच्या रात्री सुद्धा तो तिथे नशा करत बसला होता. त्यानंतर नशेतच त्याने समोरच असणाऱ्या लेक फ्रंट सॉलिटीअर इमारतीत पाठीमागून प्रवेश करत चोरी करून त्याच मार्गाने पोबारा केला होता” असेही एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to शाब्बास पवई पोलीस: पवईतील सगळ्यात मोठ्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

  1. प्रसाद सुरेश चव्हाण August 18, 2020 at 6:30 pm #

    पवई पोलीस अनुषंगाने मुंबई पोलीस म्हणजेच महाराष्ट्र पोलीस यांचे हार्दिक अभिनंदन…?
    आमचा महाराष्ट्र पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे..?
    तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.

    *प्रसाद सुरेश चव्हाण, पवई*

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!