युथ पॉवरच्या छत्री वाटप आंदोलनाला ‘बेस्ट’ यश; बस थांब्यावर बसवले छप्पर

रविराज शिंदे

वईमधील आयआयटी येथील सर्वच बस थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना पावसाळ्या सोबतच उन्हातान्हात सुद्धा त्रास सहन करत बस येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. या बस थांब्यावर छप्पर उभारण्यात यावेत यासाठी, ‘युथ पॉवर’ संघटनेच्यावतीने बेस्ट प्रशासनाला कानपिचक्या काढत प्रवाशांना छत्री वाटप करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बेस्ट प्रशासनाने दखल घेत अखेर पवईतील आयआयटी मार्केट जंक्शन, आयआयटी मेनगेट, पवई प्लाझा बस थांब्यावर छप्परांचे  बसथांबे बसवण्यात आले आहेत. या छप्परांच्या बस थांब्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड निर्मितीनंतर गणेश विसर्जन घाट, हिरानंदानी, पवई विहार आणि पंचकुटीर येथे आधुनिक पध्दतीचे सुरेख छतांचे बसथांबे बसवण्यात आले होते. तर, आयआयटी मेनगेट आणि मार्केट गेट येथील बसथांब्याना सावत्रपणाचा दर्जा देत येथे केवळ बस खांबे बसवण्यात आले होते.

या बसस्टॉपवरुन फुलेनगर, आयआयटी, चैतन्यनगर, इंदिरानगर, माता रमाबाई आंबेडकरनगर, गरीबनगर, मोरारजीनगर, हनुमान रोड या परिसरातील दररोज किमान ८०० – ९०० प्रवाशांची ये-जा होत असते. आयआयटी संस्थांनात काम करणारे कर्मचारी, कॉल सेंटर्स आणि येथील अनेक कॉर्पोरेट कार्यालयात काम करणारे कर्मचारी सुद्धा या बस थांब्यांचा वापर करतात. येथील स्थानिक भागात राहणाऱ्या अनेक शाळा – महाविद्यालयांतील विद्यार्थ्यां सुद्धा याच बस थांब्यांचा वापर करतात.

एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात येथून प्रवास करण्याऱ्या सर्वच्या सर्व प्रवाशांना मात्र मुसळधार पावसासह कडकडीत उन्हात सुद्धा ताटकळत उभे राहून बसची वाट पहावी लागत असे. याबाबत अनेक पातळीवरून बेस्ट प्रशानाला तक्रारी करून सुद्धा काहीच फरक पडत नसल्याने अखेर या समस्यांची दखल घेत नवतरुणांच्या युथ पॉवर संघटनेने पुढाकार घेत बस थांब्यांवर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना छत्रीचे वाटप करून आगळेवेगळे आंदोलन केले होते.

प्रशासनाला पत्रव्यवहार करुन या बस थांब्यावर छत बसवण्याची मागणी केली होती. ज्याची दखल घेत बेस्ट प्रशासनाने अखेर गेल्या आठवड्यात येथे छतांचे बस थांबे बसवले आहेत. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes