ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात पवई, चांदिवलीमध्ये साजरी झाली शिवजयंती

सोमवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दणाणला, निमित्त होते ते शिवजन्म उत्सव. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार शिवजयंती जन्मोत्सव सोमवारी साजरा झाला. पवई, चांदिवली भागात देखील सोमवारी मोठ्या उत्साह, जल्लोष आणि ढोल ताशांच्या गजरात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

पवई चांदिवली भागात शिवप्रेमी तसेच विविध मंडळानी ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक वेशभूषा, मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, चित्तथरारक मर्दानी खेळ, शिवज्योत आणि शिवचरित्रावर आधारित कार्यक्रमातून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

शिवसेना प्रभाग क्रमांक १२५ आणि १६२तर्फे सोमवारी संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांनी पारंपारिक पोशाख करून यात सहभाग नोंदवला. तसेच भाजपा प्रभाग क्रमांक १६२च्या विधानसभा महामंत्री रेश्मा चौगुले यांच्यावतीने चांदिवली संघर्षनगर येथील शिव चौकात स्थानिक नागरिकांच्या हस्ते ३९२ शिवज्योत (मशाली) लावून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

चांदिवली गणेश मैदान येथे शिवसेना युवा विभाग अधिकारी चांदिवली मनोज सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गड किल्ल्यांची प्रतिकृती उभी करत तेथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!