मेट्रो-६ भूमिगत करण्याच्या समर्थनात पवईत सह्यांची मोहीम

आज, रविवार (२ फेब्रुवारी) संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत चांदिवली डी-मार्टजवळ भूमिगत मेट्रो-६ समर्थनात सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे.

पवईतील विविध भागात भूमिगत मेट्रो -६ च्या समर्थनात सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. आज रविवार (२ फेब्रुवारी) चांदिवली डी-मार्टजवळ आणि रहेजा विहार येथे ही मोहिम राबवली जाणार आहे. संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत भूमिगत मेट्रोच्या मागणीच्या समर्थनात असणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी भेट देवून आपले समर्थन नोंदवता येणार आहे.

मेट्रो-६ लाईन पश्चिमेला स्वामी समर्थनगर, लोखंडवालापासून सुरू होत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून (जेव्हीएलआर) पूर्वेकडील पूर्व धृतगती मार्गाजवळ संपते.

जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवरून पवई मार्गे जाणाऱ्या मेट्रो-६ प्रकल्पाचे बांधकाम डिसेंबर २०१८ पासून सुरु झाले आहे. मात्र संभाव्य समस्या पाहता या मार्गावरील मेट्रो मार्ग एलिव्हेटेड बनवण्याऐवजी भूमिगत (अंडरग्राउंड) करावा अशी मागणी यापूर्वीच नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, मेट्रो – ६ प्रकल्पाच्या कॉरिडोरच्या निर्मिती कामाच्या सुरू करण्याच्या जवळजवळ सहा महिन्यानंतर अखेर एमएमआरडीएने याबाबत नागरिकांचा सल्ला मागितला होता.

एमएमआरडीएने २१ मे रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी नागरिकांनी प्राधिकरणाने नागरिकांच्या सूचना घेण्यापूर्वीच काम सुरु केल्याबद्दल आपली नाराजी दर्शवली होती. एमएमआरडीएने घेतलेल्या बैठकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवत आपले आक्षेप आणि सूचना नोंदवल्या.

आता चालू असणाऱ्या मेट्रो–६ मार्गाच्या नियोजनानुसार आधीच वाहतूक कोंडीच्या जाळ्यात असणाऱ्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) परिस्थिती अधिकच खराब होईल. पवई तलावाची शांतता भंग होईल. विस्तृत प्रकल्पाच्या अहवालात पवई तलाव, महाकाली गुंफा किंवा सीआरझेडमध्ये येणाऱ्या क्षेत्रांवर पर्यावरणाच्या होणाऱ्या परिणामाविषयी अभ्यास – चर्चा केली नाही, असे याबाबत बोलताना भूमिगत मेट्रोसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां सोनाली मिश्रा यांनी सांगितले.

मेट्रो – ६ सध्याच्या एलेव्हेटेड मार्गाला विरोध करतानाच आर्किटेक्ट आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन किल्लावाला यांनी नवीन कल्पना मांडली आहे. भूमिगत प्रकल्प असणाऱ्या मेट्रो-३ कॉरिडॉरला (कोलाबा-बांद्रा-सिप्झ) जोडून ३ किलो मीटरचा विस्तार यात सूचित करण्यात आला आहे. मरोळनाका येथून साकीविहार मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीच्या पाठीमागून विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत हा मार्ग पोहचेल. अशाप्रकारे ही लाइन आधीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या जेव्हीएलआरवर येणार नाही आणि पवई तलावाच्या निसर्ग सौंदर्याचे सुद्धा रक्षण होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नसून, तो निसर्गाचे नुकसान करत असताना येणाऱ्या काळात त्याच्या प्रस्तावित मार्गामुळे किती प्रमाणात नागरी समस्या वाढवणार आहे याचा अभ्यास करता फक्त एलिव्हेटेड मार्गाला आमचा विरोध आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच्यासाठीच नाही तर आपल्या आणि आपल्या भावी पिढीचा विचार करता आमच्या या मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन सुद्धा या कार्यकर्त्याकडून करण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!