एस एम शेट्टी रोडच्या कामाची सुरुवात, वाहतूक वळवली

शिवभगतानी मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर बुधवारी, १३ तारखेपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील २० ते २५ दिवस हे काम चालणार असून, या मार्गाने चांदिवलीकडे जाणारी वाहतूक म्हाडा, प्रथमेश कॉम्प्लेक्स मार्गे वळवण्यात आली आहे. या मार्गावरून चालणाऱ्या बेस्ट बसेस क्रमांक ३५९ (लिमिटेड) आणि ४०९ (लिमिटेड) यांच्या मार्गात सुद्धा बदल करण्यात आला असून, बस क्रमांक ३९२ च्या मार्गावरून या बस दरम्यानच्या काळात चालणार आहेत. या मार्ग बदलामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्यामुळे, पवईकर आणि चांदिवलीकर त्रस्त झाले आहेत.

मुंबईच्या अनेक भागात पालिकांतर्गत पावसाळापूर्व कामांना सुरुवात झाली होती. पवईत सुद्धा ठिकठिकाणी पालिका, सेन्ट्रल एजेन्सीतर्फे गटारे, रस्ते निर्मितीची कामे सुरु होती. चांदिवली आणि हिरानंदानी भागाला जोडणारा एसएमशेट्टी शाळेमार्गे येणारा रस्ता हा सगळ्यात मोठा दुवा आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि याचीच दखल घेत या वर्षी या रस्त्याच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले होते. एप्रिल महिन्यात दोन भागातील या रस्त्याच्या निर्मितीला सुरुवात करत पावसाळ्यापूर्वी याच्या पहिल्या भागाचे (एसएम शेट्टी सर्कल ते म्हाडा कॉम्प्लेक्स) काम पूर्ण करण्यात आले होते.

“रस्ता निर्मितीच्या कामासह रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गटारांची पुनर्निर्मिती करून त्यांना येथील मुख्य गटारांना जोडण्यात आले आहे. गुरुवारपासून रस्त्या निर्मितीच्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाली असून, पुढील महिनाभरात हे काम पूर्ण होईल,” असे आवर्तन पवईशी बोलताना स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी सांगितले.

रोड निर्मितीच्या कामामुळे येथून चांदिवलीकडे जाणारी आणि येणारी वाहतूक वळवण्यात आली असून, जलवायूमार्गे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड़वरून डीपी रोड क्रमांक ९ वरून रस्ता निर्मितीचे काम सुरु असेपर्यंत दोन्ही भागातील नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे. लेकहोम मध्ये जाणारे नागरिक पवई विहार कॉम्प्लेक्समार्गे प्रवास करू शकणार आहेत.

आम्हाला हिरानंदानीकडून येताना एसएमशेट्टी रस्त्याने येणेच सोयीचे असते, लेकहोम कॉम्लेक्समध्ये बाहेरील वाहनांना येण्यास प्रवेशबंदी असल्याने डीपी रोड नंबर ९ वरून चांदिवली फार्म रोडमार्गे येणे आम्हाला खूप त्रासदायक ठरणार आहे,” असे याबाबत बोलताना पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्सच्या काही रहिवाशांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

शाळा, सोसायट्याना पालिकेचे पत्र

या मार्गावर बुधवारी सकाळी अचानक कामाची सुरुवात करत वाहतूक बंद केल्यामुळे म्हाडा स्टाफ कॉलोनी आणि पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. कोणतीही पूर्वसूचना न-देता पालिकेने काम सुरु केले असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. याबद्दल पालिकेकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) पालिका ‘एस’ रोड विभागाचे सहाय्यक अभियंत्यांनी सूचना पत्रक काढत एसएम शेट्टी शाळा प्रशासन आणि आयआयटी मुंबई स्टाफ कॉलोनीला या मार्गावर रोड निर्मितीचे काम सुरु असून रस्ता बंद करण्यात आल्याचे कळवले आहे. नवदीप कंस्ट्रकशनला हे काम देण्यात आले असल्याचे सांगत पुढील २० ते २५ दिवस हा मार्ग बंद राहणार आहे. वाहतूक विभागाची याबद्दल संमती मिळवण्यात आली असून, नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पत्रात सांगण्यात आले आहे.

बेस्ट मार्गात बदल


रस्ता निर्मितीच्या कामासाठी वाहतूक बंद केल्यामुळे बेस्ट प्रशासनाने सुद्धा या मार्गावरून चालणाऱ्या बेस्ट बसेस क्रमांक ३५९ (लिमिटेड) आणि ४०९ (लिमिटेड) यांच्या मार्गात बदल केला आहे. या मार्गावरून पुन्हा वाहतूक सुरु होईपर्यंत या दोन्ही मार्गावरील बसेस बस मार्ग क्रमांक ३९२ च्या मार्गावरून (जलवायू, जेव्हीएलआर, आंबेडकर उद्यान, एलअँडटी, साकीविहार, चांदिवली) चालणार आहेत. याबाबद्दल त्यांनी सर्व संबंधित डेपोंना सूचना पत्रक काढत कळवले आहे. नागरिकांच्या सूचनेसाठी ट्विटरवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वाहतूक कोंडी वाढली

वाहतूक बंद करण्यात आलेला एसएम शेट्टी रोड हा चांदिवली – हिरानंदानीला जोडणारा महत्वाचा दुवा असल्याने जलवायूविहार, पवईविहार, लेकहोम, डीपी रोड नंबर ९ आणि चांदिवली फार्म रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. आधीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या डीपी रोड आणि चांदिवली फार्म रोडवर वाहतूक कोंडीचा फुगा निर्माण होत याचा परिणाम आता हळूहळू बाकी परिसरात सुद्धा जाणवू लागला आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!