फुलेनगरमध्ये शौचालय दुरुस्तीत दिरंगाई; तरुणास सर्पदंश

@अविनाश हजारे

पवईच्या राष्ट्रपिता महात्मा फुलेनगर वसाहतीमधील मुख्य शौचालय बांधणीस मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाकडून होत असलेली दिरंगाई आणि या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या विभागातील एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे.

वैभव भगत असे या तरुणाचे नाव असून, परिसरात शौचालय उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या अन्य एका मित्रासोबत तो बाजूच्या जंगलात शौचास गेला असताना विषारी सापाने त्याला दंश केल्याची घटना येथे घडली. तरुणास त्वरित सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

फुलेनगरमधील मुख्य शौचालय दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राटदार आणि महापालिका (परिरक्षण) अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष आणि दिरंगाईमुळे दुरुस्तीचे काम चांगलेच रखडलेले आहे. यामुळे या विभागातील रहिवाशांचे, विशेषतः महिलांची मोठी कुचंबणा सुरू आहे. उपयोगात घेता येईल असे शौचालय उपलब्ध नसल्याने रहिवाशांना नाईलाजास्तव जवळच असणाऱ्या जंगलात शौचास जावे लागते.

वैभव सुद्धा या जंगलात शौचास गेला असता त्यास विषारी सापाने दंश केला. तातडीने सायन रुग्णालयात दाखल केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असला तरी, या घटनेमुळे परिसरातील रहिवाशी भयभीत झाले आहेत. निवडणूक काळात येथे तळ ठोकून असणाऱ्या लोक प्रतिनिधींनी समस्या माहित असून सुद्धा दुर्लक्ष केले असल्यामुळे, निष्क्रिय आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींवर रहिवाशी संतापले आहेत.

पुढील १५ दिवसांत शौचालयांचे काम पूर्ण न-झाल्यास पालिका ‘एस विभाग’ कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे महात्मा फुलेनगर कार्यकारी समूहाचे अध्यक्ष दिलीप हजारे आणि सचिव संजय भालेराव यांनी याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes