स्टाफ सिलेक्शन परीक्षेत कॉपी करणाऱ्या ११ जणांना पवईत अटक

पवईतील ऑरेम आयटी पार्क, या ऑनलाईन एक्झाम सेंटरमध्ये मंगळवारी स्टाफ सिलेक्शन परीक्षेत इलेक्ट्रिक यंत्रांच्या साहय्याने कॉपी करणाऱ्या ११ जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. कॉपी करण्यासाठी ब्लूटूथ, कॉलर डीवायस आणि मायक्रोफोनचा वापर करण्यात येत होता. सेंटरवर असणाऱ्या दक्ष अधिकाऱ्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. महाराष्ट्र विद्यापीठ व बोर्ड परीक्षांमधील गैरवर्तन प्रतिबंधक अधिनियम १९८२ अन्वये कलम ७ व ८ नुसार गुन्हा नोंद करून, अटक परीक्षार्थीना बुधवारी न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १८८० परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. यावेळी परीक्षा केंद्रावरील सुपरवायझर केतन चव्हाण हे हॉल क्रमांक दोनमध्ये परिक्षणासाठी गेले असता, दोन विद्यार्थी (प्रदीपकुमार ओमप्रकाश आणि राजू रामनिवास) कानावर हात ठेवून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना बाजूला घेवून झडती घेतली असता त्यांच्याकडे ब्लूटूथ, कॉलर डिव्हाइस आणि मायक्रोफोन मिळून आले जे परीक्षा केंद्रात प्रतिबंधित आहेत.

चव्हाण यांनी याबाबत पोलिसांना तक्रार केली असता, “आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली असता अजून ९ परीक्षार्थी अशा प्रकारे कॉपी करत असल्याबाबतची माहिती त्यांनी दिली” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

“प्रदीपकुमार ओमप्रकाश (२६), राजू रामनिवास (२०), अमन हरिकेश (२३), दिनेश दलबीर (२५), मोहित बिजेंद्र (२०), कुशकुमार पुलकुमार (२४), नवीन सुभाषचंद्र (१९), सुमित कुलदीप (२१), राकेश ओमप्रकाश (२३), सौरभ सुभाष (२१), आणि नवीन रणधीर सिंग (२३) अशी अटक करण्यात आलेल्या ११ जणांची नावे आहेत. सर्व हरियाणातील जिंद व हिसारचे रहिवासी आहेत. त्यांना हरियाणामधील सहाय्यकांकडून मदत मिळाल्याचा संशय आहे”, असेही याबाबत बोलताना पोलीस म्हणाले.

महाराष्ट्र विद्यापीठ व बोर्ड परीक्षांमधील गैरवर्तन प्रतिबंधक अधिनियम १९८२ अन्वये कलम ७ व ८ नुसार गुन्हा नोंद करून, अटक परीक्षार्थीना बुधवारी न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड आणि पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे करत आहेत.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes