गुप्तांगात लाकडी पट्टी घालून अत्याचार, एफआयआर दाखल

प्रातिनिधिक छायाचित्र

हिरानंदानी, पवई येथील गॅलेरिया मॉलमध्ये राहणार्‍या ९ वर्षांच्या नुरी नामक भटक्या कुत्रीवर तिच्या गुप्तांगात लाकडी पट्टी घालून निर्घृण बलात्कार करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्राणीमित्र देवी शेठ आणि निहारिका गांधी यांनी बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्स एनजीओच्या मदतीने तिला एका पशु देखभाल केंद्रामध्ये दाखल केले. जेथे डॉक्टरांनी तिच्या खाजगी भागातून एक लाकडी पट्टी काढली. नूरीवर सध्या जोगेश्वरी केंद्रात उपचार सुरू आहेत परंतु तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

देवी शेठ आणि निहारिका गांधी प्रमाणेच परिसरातील सुमारे सात ते आठ प्राणीप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील भटक्या प्राण्यांना खाण्यास देण्यासोबतच त्यांची देखभाल करत असतात. निहारिका गांधी यांनी बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्स एनजीओचे विजय मोहनानी यांना फोन करून, त्यांची सहकारी देवी शेठ यांनी त्यांना हिरानंदानी गार्डन्स, गलेरिया येथे असणाऱ्या ९ वर्षीय भटकी कुत्री नुरी हिच्या लघवीच्या जागेतून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे असे सांगितले असल्याची माहिती दिली. आम्ही त्यांना वर्ल्ड फॉर ऑल, जोगेश्वरी येथे प्राण्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी घेवून जाण्यास सांगितले. असे पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्स एनजीओचे गितेन दुधानी यांनी म्हटले आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारादरम्यान प्राण्याच्या गुप्तांगातून एक लाकडी पट्टी बाहेर काढली आहे. असेही या तक्रारीत म्हटले आहे.

गितेन यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात प्राण्याच्या गुप्तांगात लाकडी पट्टी बळजबरीने घुसवून तिचेशी लैंगिक अत्याचार करून, तिला विकलांग करून, क्रूरतेने वेदना दिली म्हणून भादवि कलम ४२९, ३७७ आणि प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला आहे.

पशुवैद्यकीय डॉक्टरांनी नूरीवर काही तास शस्त्रक्रिया केली. तीच्या आतड्यांसह अनेक अवयवांना इजा झाल्याचे आढळले आहे. नुरीच्या शरीरातून अतिरक्तस्त्राव झाला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्या उपचारासाठी संस्थेकडून मदतीचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

मोठ्या क्रूर रीतीने नुरीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. एकापेक्षा जास्त व्यक्तींचा या गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता आहे. निर्भया प्रकरणात आणि या प्रकरणात वेगळेपण असे काहीच नाही. फक्त तिथे त्यात मानवी सहभाग होता आणि येथे ती एक प्राणी आहे. असे याबाबत बोलताना काही प्राणीमित्रांनी सांगितले.

या अपराधास जो कोणी व्यक्ती जबाबदार असेल त्यास त्वरित पकडलेच गेले पाहिजे. आज एक प्राणी आहे, उद्या हे एक लहान मूल, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असू शकतात, अशी मागणी आता पवईकरांकडून होत आहे.

“आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले असून, इतर पुरावे सुद्धा जमा करत आहोत. लवकरच गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असेल, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!