पवईत १६व्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

सोळाव्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पवई येथे घडली आहे. शिवम पांडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, पवई पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

शिवम हा पवईतील रहेजा विहार भागात असणाऱ्या इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होता. “दहावीत शिकणाऱ्या शिवमचा एक पेपर बाकी असल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तो अभ्यास करत बसला होता. सोमवारी दुपारी जेवनानंतर तो आराम करण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये गेला. यावेळी त्याचे आई वडील बाहेर हॉलमध्येच बसले होते.” असे यासंदर्भात पवई पोलिसांनी सांगितले.

बराच वेळ शिवम बाहेर न आल्याने त्याच्या आईने त्याच्या बेडरूमचा दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आईला शंका आल्याने तिने इमारतीच्या खालील गॅलरीत पाहिले असता तो लॉनमध्ये पडलेला आढळून आला.

शिवमच्या नातेवाईकांनी खाली धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले.

इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने याबाबत पवई पोलिसांना माहिती दिल्यानंतर पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवमच्या कुटुंबियांचा जवाब नोंदवला. शिवम हा बऱ्याच वेळा बेडरूमच्या बाहेर एसीच्या पंख्याजवळ बसून फोनवर बोलत असे, पोलिसांना दिलेल्या जवाबात शिवमच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

“सोमवारी कदचित असाच फोनवर बोलत तो बसला असावा, यावेळी कदाचित त्याचा फोन हातातून निसटला असेल आणि त्याला पकडण्याच्या नादात त्याचा तोल जावून तो खाली पडला असेल असा प्राथमिक अंदाज आहे, असे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पवई पोलिस अपमृत्युची नोंद करून अधिक तपास करत आहेत.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!