पवईत शाळेजवळ विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न?

पवई आयआयटी येथील एका नामांकित शाळेबाहेरून एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी पवईत घडली. याबाबत शाळा प्रशासनाने पवई पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई, आयआयटी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकणार अनिकेत (बदलेले नाव) हा दुपारी १२.४५ वाजता शाळा सुटल्यानंतर आपल्या स्कूल बसची वाट पाहत शाळेबाहेर उभा होता.

तो एकटाच उभा असल्याचे पाहून डोक्यात हेल्मेट घातलेला एक इसम मोटारसायकलवरून त्याच्याजवळ आला ‘बेटा मुझे तुम्हारे पापा ने भेजा है, और तुम्हे लाने के लिये कहा है!’ असे सांगत त्याला ओरीओ चॉकलेट बिस्कीट दिले. मात्र अनिकेतने त्याला विरोध दर्शवत स्कूलबस मधूनच जाण्याचा निर्णय घेतला.

‘आज सकाळी अनिकेतच्या पालकांनी शाळेत येवून घडलेला सगळा प्रकार आम्हाला सांगितला आणि आम्हाला धक्काच बसला. यासंदर्भात आम्ही त्वरित पवई पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत’ असे याबाबत बोलताना शाळा प्रशासनाने सांगितले.

अनिकेतच्या सजग निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी, या घटनेमुळे पवईतील शाळेबाहेर विद्यार्थ्यांना असणारा धोका पुन्हा एकदा पालकांसमोर उभा ठाकला आहे. विद्यार्थी – पालक यांच्यातील जनजागृती सोबतच शालेय वेळेत पालकांव्यतिरिक्त होणारी गर्दी, शाळेच्या आसपासच्या परिसरात उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे निर्माण होणारी कोंडी यासारखी अनेक कारणे अशा घटनांना वाव मिळवून देतात. त्यामुळे यावर पोलीस आणि वाहतूक विभाग यांनी मिळून योग्य ती खबरदारी घेतल्यास अशा घटना टाळता येतील अशी मागणी सुद्धा पवईकरांकडून या घटनेनंतर होत आहे.

गेल्या महिन्यातच पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय लाड, पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्या नेतृत्वाखाली अशा घटना रोखण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत आयआयटी येथील चौकाचौकात मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘आम्हाला याबाबत माहिती मिळाली असून, आम्ही मुलासोबत बोलण्याबरोबरच परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासत आहोत. पालकांशी बोलून पारिवारिक किंवा इतर कोणत्या वादातून हे पाऊल उचलले गेले आहे का? याबाबत सुद्धा माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!