भाजप प्रवक्ताने विद्यार्थ्याबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याच्या विरोधात विद्यार्थ्यांची हॅशटॅग मोहीम

आवर्तन पवई | मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पेपर पुनर्तपासणी  निकालात होणाऱ्या दिरंगाई आणि विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल संजय पाटील या संतप्त विद्यार्थ्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना टॅग करून केलेल्या ट्वीटला भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी प्रतीउत्तरादाखल केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमावर हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमे अंतर्गत विद्यार्थी #लायकीनाही #अवधूतवाघ #विनोदतावडे असे हॅशटॅग वापरून आपला संताप आणि निषेध सोशल माध्यमातून व्यक्त करत आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल उलटून गेल्यानंतरही अनेक महिने विद्यापीठाने निकाल घोषित केले नव्हते. दिरंगाईबद्दल विद्यार्थी, पालक यांच्याकडून संताप व्यक्त केले जात होते. याचा उद्रेक होण्याच्या मार्गावर असतानाच कशीबशी जुळवाजुळव करून घाई-गडबडीत विद्यापीठाकडून काही निकाल घोषित करण्यात आले. मात्र, त्यात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना नापास दाखवण्यात आल्याने नाराज विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणीची मागणी केली आहे.

पुनर्तपासणीची निकाल जाहीर करण्यासाठी होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असूनही, प्रशासन मात्र ढिम्म होवून बसले आहे, याचा जाब विचारायला गेलेल्या विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यातील एक विद्यार्थी संजय पाटील याने याबाबत विनोद तावडे यांना टॅग करून विचारणा केली होती.

पाटील याच्या टॅगला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर तर दिलेच नाही, मात्र भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी विद्यार्थ्याची पास होण्याची लायकीच नसल्याचे वक्तव्य करून आधीच संतप्त विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

या वक्तव्याने संतप्त विद्यार्थ्यांनी वाघ यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि सरकार, विद्यापीठ यांच्यापर्यंत आपली संतप्त प्रतिक्रिया पोहचवण्यासाठी हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!