आवर्तनच्या पाठ्पुराव्याला यश; आमदार लांडेच्या प्रयत्नातून विजय विहार रोडच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

माजी आमदार नसीम खान, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या श्रेयवादानंतर २०१९ पासून दुरुस्ती अभावी खितपत पडून असणाऱ्या विजय विहार समोरील रोडच्या दुरुस्तीचे काम अखेर सोमवारपासून सुरु झाले आहे. स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी रविवारी नारळ फोडून या कामाचा शुभारंभ केला.

पवई येथील विजय विहार रोड गेल्या अनेक वर्षापासून लवादात सापडल्याने खितपत पडला आहे. मात्र दुरुस्तीच्या कामामुळे तात्पुरत्या स्वरुपात का होईना मात्र याच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना काही काळ का होईना दिलासा मिळत असतो.

पवई विहार आणि लेक होम या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हिरानंदानी व जेव्हीएलआरकडून जलवायू विहार मार्गे विजय विहार असा एकमेव प्रवेश रस्ता आहे. येथील भागात विकासकाम सुरु असणाऱ्या इमारतीचे विकासक, गुंतवणूकदार यांच्यामधील वाद न्यायालयात पोहचल्याने येथील रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष लटकले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना पवईकरांना एखाद्या परग्रहावर पोहचल्यासारखे भासत असते. यासाठी स्थानिक नागरिक सतत लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत असतात. मात्र कोर्टात येथील मालकी हक्काला घेवून असणाऱ्या वादाचा दाखला देत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन टोलवाटोलवीची उत्तरे देत याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असते आणि याचा नाहक त्रास वर्षानुवर्ष येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो.

त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच सुरु झाले आहे. आमदार आरिफ नसिम खान यांच्या फंडातून रोड दुरुस्तीचे काम केले जात असून, पावसाळ्यापूर्वी रोडचे काम पूर्ण होणार असल्याचे याच्या ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात आवर्तन पवई आणि स्थानिक नागरिक सतत आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करत होते. “आम्हाला याबाबत कोणतीही तक्रार मिळालेली नाही. स्थानिक नागरिकांनी असे तक्रारीचे पत्र दिले तर आम्ही याबाबत पाठपुरावा करू,” असे यासंदर्भात बोलताना स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी आवर्तन पवईच्या पाठपुराव्याला उत्तर देताना म्हटले होते.

जून २०१९मध्ये याच रस्त्याच्या निर्मितीवरून त्यावेळचे स्थानिक आमदार नसीम खान आणि स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्यात या रोडच्या निर्मितीवरून श्रेयवाद रंगला होता. मात्र महिन्याभरातच या नवनिर्मित रस्त्याला पुन्हा खड्डे पडल्यावर त्याचे श्रेय घेण्यास मात्र कोणीच पुढे आले नव्हते. आणि त्यानंतर आजपावोत हा रस्ता दुरावस्थेतच घटका मोजत होता.

आवर्तन पवई विविध पक्षाच्या नेत्यांकडे याबाबत सतत पाठपुरावा करून किमान तात्पुरत्या स्वरुपात तरी या रस्त्याचे काम करून नागरिकांना थोडासा दिलासा मिळवून देण्याची मागणी करत होते. याच पाठपुराव्या दरम्यान स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्यासमोर आवर्तन पवईने हा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी या रस्त्याबद्दल स्थानिक नागरिकांची तक्रार मला मिळाली असून, मी परिस्थितीची पाहणी केली आहे. येथील जागेबद्दल न्यायालयात प्रकरण चालू असून, त्याबद्दल मी माहिती मागवली असून, त्याचा अभ्यास करून लवकरच योग्य तो मार्ग काढत याच्या दुरुस्तीचे काम सुरु करतो असे आश्वासन लांडे यांनी आवर्तन पवईला दिले होते. अखेर तो शब्द पाळत लांडे यांच्या प्रयत्नाने सोमवारपासून या कामाला सुरुवात झाली आहे.

“वादाच्या भोवऱ्यात असल्याने थोडा वेळ लागला आहे. मात्र आता नागरिकांना जसा हवा आहे तसा आणि जास्त काळ टिकेल असा रस्ता निर्माण केला जाणार आहे. यावेळी नागरिकांच्या सूचनांना रस्ता निर्मितीत अधिक महत्व दिले जाणार आहे. तसेच नागरिकांच्या इतर मागण्याही आहेत त्यांच्या निवारणासाठी सुद्धा माझे प्रयत्न सुरु आहेत,” असे यावेळी बोलताना आमदार लांडे म्हणाले.

पवई विहार गेट ते म्हाडा चौकापर्यंत बनवण्यात येणाऱ्या या रस्त्यावर नागरिकांच्या मागणीनुसार पेवरब्लॉक बसवण्यात येणार असून, मधील भागात दुभाजक टाकण्यात येणार आहे. रस्त्यावर पाणी साठून राहण्याने रस्त्यावर खड्डे पडत असल्याने रस्ता निर्मितीच्या वेळी पावसाचे पाणी वाहून जाण्याची योग्य सोय सुद्धा केली जाणार आहे. तसेच या मार्गावर रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने होणाऱ्या अंधाराचा विचार करता त्याची कशी सोय करता येईल याबाबत प्रशासकीय दरबारी पाठपुरावा केला जाणार आहे.

यासंदर्भात बोलताना प्रथमेश कॉम्प्लेक्स सोसायटीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासक सावंत याने या भागात पुन्हा काम करण्याची तयारी दर्शवली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्याने हा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने येथे कमर्शियल आणि रेसिडेन्सीअल गुंतवणूक केलेल्या सदस्यांशी चर्चा देखील केली आहे. तसेच त्याने रस्त्याच्या बांधकामासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता या परिसराचा कायापालट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासंदर्भात बोलताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली कि, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करता न्यायालयातून विशेष परवानगी मिळवून ६३ के अंतर्गत काम करता येते. ६३के अंतर्गत रस्त्यावर मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार काम करत असताना १/३ भाग हा नगरसेवक/आमदार/खासदार यांच्या फंडातून वापरला जात असतो, तर २/३ भाग हा पालिका फंडातून वापरता येतो.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!