बनावट पॅकर्स आणि मुव्हर्स प्रकरण: मुख्य आरोपींना अटक

बनावट पॅकर्स आणि मुव्हर्स कंपनी बनवून मुंबईकरांच्या मौल्यवान वस्तू आणि गाड्या लांबवणाऱ्या टोळीतील दोघा मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात पवई पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. पाठीमागील महिन्यात पवईतील कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीने पतीच्या एका मित्राला मिझोरम येथे पाठवलेल्या एसयुव्ही कारसह ३३.८ हजाराला गंडा घालणाऱ्या गुन्ह्याचा तपास पवई पोलीस करत होते. विकास करणसिंग भारद्वाज (२१) आणि अमितकुमार जयप्रकाश शर्मा (२७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सापळा रचून कळंबोली येथून रविवारी पवई पोलिसांनी त्यांना अटक केली.

“अग्रवाल ऑल इंडिया मूव्हर्स अँड पॅकर्स” या बनावट नावाने ते हा गुन्हेगारीचा व्यवसाय चालवत होते. मुंबईतील अनेक लोकांना त्यांनी या बनावट मूव्हर्स अँड पॅकर्सच्या नावावर गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

‘तपास सुरु असताना टेक्निकल देखरेखीत कळंबोली येथे आम्हाला यातील काही सूत्रधारांचे लोकेशन मिळून आले होते, ज्याच्या आधारावर आम्ही पाठीमागील आठवड्यात मूळचे हरियाणातील असणारे रमनकुमार शर्मा (२३) आणि विकास शर्मा (२३) यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर यातील मुख्य सुत्रधार विकास भारद्वाज आणि अमितकुमार शर्मा हे कळंबोली येथे येणार असल्याची माहिती आमच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर सापळा रचत आम्ही रविवारी दोघांना अटक केली आहे’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

‘अग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्स या नावाने अजून एक नामांकित कंपनी अस्तित्वात आहे. याचाच फायदा घेत यातील सूत्रधारांनी सारख्याच नावाची फक्त नावात एक ‘जी’ हे इंग्रजी अक्षर वाढवून आपली बनावट कंपनीची नोंद केली होती. त्यांनी या कंपनीच्या नावे जीएसटीनंबर सुद्धा घेतला आहे. मात्र त्यांनी आपल्या व्यवहारासाठी दिलेले कार्यालयांचे पत्ते खोटे असून कोणतेच कार्यालय तेथे नाही’ असेही ते पुढे म्हणाले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून तीन वाहने ज्यात एसयुवि कार, आय १० कार आणि एका विंटेज जीपचा समावेश आहे. हस्तगत करण्यात आलेली वाहने ही पवई, साकीनाका नागपाडा आणि दिंडोशी पोलीस ठाण्यात दाखल गुह्यातील आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून बनावट मूव्हर्स अँड पॅकर्सच्या नावावर बनवलेली कंसाइंटमेंट डिलिव्हरी चलनाची ३२ पुस्तके, लेटरहेड आणि याच नावाने असणारी इतर काही कागदपत्रे सुद्धा हस्तगत केली आहेत.

अटक आरोपींना भादवि कलम ४०७, ४२०, ३४ अनुसार गुन्ह्यात न्यायालयात हजर केले असता ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पवई प्रकरण

आपल्या पतीच्या एका मित्राला मिझोरम येथे स्कोर्पिओ जीप पाठवण्यासाठी पवईतील कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या ३४ वर्षीय पत्नीने अशी सुविधा देणाऱ्या लोकांच्या बाबतीत ऑनलाईन माहिती पाहिली असताना “अग्रवाल ऑल इंडिया मूव्हर्स अँड पॅकर्स”ची माहिती त्यांना मिळाली. १८ फेब्रुवारीला त्यांनी मूव्हर्स अँड पॅकर्सच्या (७२१०००२४००/७०१०००२७००) नंबरवर संपर्क साधून आपल्याला एक गाडी मिझोरम येथे पाठवायची असल्याचे सांगितले.

‘पिडीत आणि तिचा पती मुंबईच्या बाहेर असताना त्यांना त्या बनावट मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीकडून फोन आला होता. फोनवर त्यांनी त्यांची दोन माणसे येवून गाडी पाठवण्याची कागदोपत्री पूर्तता करून गाडी ताब्यात घेतील अशी माहिती दिली. त्या दोन माणसांनी गाडी गुवाहाटी येथे पोहचायला सहा ते सात दिवस लागतील अशी माहिती दिली होती’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

२३ फेब्रुवारीला मूव्हर्स अँड पॅकर्सच्या खात्यात गाडी पोहचवण्याचा मोबदला म्हणून अधिकाऱ्याने ३३८०६ रुपये आपल्या दिल्ली येथील खात्यातून जमा केले.

गाडी घेवून जाताना कंसाइंटमेंट डिलिव्हरी इनव्हॉइस सुद्धा देण्यात आले होते. मात्र, मार्च १० पर्यंत गाडी निर्धारित ठिकाणी पोहचली नसल्याने महिलेने चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता काहीच माहिती मिळून आली नसल्याने तिने पवई पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes