वृद्ध दाम्पत्याला दिलासा; रिक्षात विसरलेल्या ४० तोळय़ांच्या दागिन्यांचा छडा लावत गुन्हे शाखेने परतवले

प्रातिनिधिक छायाचित्र

रिक्षातील प्रवासादरम्यान ४० तोळे सोन्याचे दागिन्यांची पिशवी हरवल्यानंतर आयुष्यभराची कमाई गेल्याने निराश झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याला गुन्हे शाखेने दिलासा मिळवून दिला आहे. आपले  तपास कौशल्य दाखवत रिक्षाचालक आणि त्याच्या एका नातलगाकडून त्यांनी दागिने हस्तगत करत वृद्ध दाम्पत्यास परत मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेने त्या दोघांना ताब्यात घेवून, पिशवीतील एका औषधाच्या पाकिटावरून या दाम्पत्याचा शोध घेत ती पिशवी त्यांना सुपूर्द केली.

साकीनाका येथे राहणारे गोपाळ मेबीयन आपल्या पत्नीसह नोव्हेंबरमध्ये लग्नसमारंभासाठी जाणार होते. घरात असणारे दागिने आपल्या विवाहित मुलीच्या घरी सुरक्षित ठेवण्यासाठी दोघे १६ नोव्हेंबरला दागिने घेऊन रिक्षाने पवईला निघाले. मुलीच्या घराच्या परिसरात पोहचल्यावर रिक्षावाल्याला भाडे देवून मुलीच्या घराकडे निघालेले असतानाच दागिने असलेली पिशवी रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र दागिने विसरल्याची माहिती होईपर्यंत रिक्षाचालक निघून गेला होता.

यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठत याची माहिती दिली. मात्र रिक्षा नंबर किंवा इतर अधिक माहिती मिळत नसल्याने पोलिसांना रिक्षाचा शोध घेणे अवघड होत होते.

गुन्हे शाखा कक्ष पाच सहायक पोलीस निरीक्षक संजय कदम यांना त्यांच्या खास खबऱ्याने एक तरुण चोरीचे सोने विकण्यासाठी साकीनाका परिसरात येणार असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक जगदीश साईल व पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कदम, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, महेंद्र पाटील, अंमलदार विलास वाबळे, रवींद्र राणे यांचे एक पथक तयार करून परिसरात सापळा रचून, दागिने विक्रीसाठी आलेल्या अजय पाल या तरुणाला ताब्यात घेतले असता पोलिसांना ४० तोळे सोने मिळून आले.

हे सोने कोणाचे आहे हे त्याला माहित नव्हते. त्याच्याकडे चौकशीत त्याचा नातेवाईक अजित पाल याला ते रिक्षात सापडल्याचे त्याने सांगितले. अजित याला ताब्यात घेवून चौकशी केली असता तो सुद्धा हे दागिने कोणाचे आहेत ते सांगू शकला नाही.

“आम्ही ज्या पिशवीत सोने सापडले ती तपासली असता त्यात मधुमेह आणि रक्तदाबावरील गोळ्यांची पाकिटे मिळाली. या पाकिटांवर औषध दुकानाचे स्टिकर होते. आम्ही या नावाची दुकाने ऑनलाईन शोधून दुकानात चौकशी केली असता, आम्हाला मेबियन नामक व्यक्तीने ही औषधे खरेदी केली असल्याची माहिती मिळाली. विकत घेणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांकही मिळून आला होता. आम्ही त्या व्यक्तीला संपर्क साधला असता त्याने आपली दागिन्यांची पिशवी हरवल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात केली असल्याची आम्हाला माहिती दिली;” असे पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.

मोबियन हे निवृत्त असून, निवृत्ती वेतनावर आपले घर चालवतात. एका मुलीचे शिक्षण सुरु असून, विवाहासाठी त्यांनी या दागिन्यांची तजवीज करून ठेवली आहे. शिवाय जीवनभर थोडे थोडे पैसे साठवून बनवल्याने दागिन्यांशी त्यांच्या भावनाही जोडल्या गेल्या आहेत. अशात या दागिन्यांच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला होता, मात्र गुन्हे शाखेने दागिनेच नाही आमचे हरवलेले आयुष्यच आम्हाला परत मिळवून दिले असल्याची भावना मेबीयन यांनी यावेळी व्यक्त केली.

अजय आणि अजित यांना पुढील कारवाईसाठी पवई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!