एटीएम कार्ड क्लोनिंगद्वारे १६ पवईकरांचे लाखो रुपये उडवले

एकाचवेळी १६ जणांच्या बँक खात्यातून पैसे गायब. पाच जणांची पोलिस ठाण्यात तक्रार. वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएम सेंटरमधून ३.२० लाख रुपये काढले.

एकाच वेळी १६ पवईकरांच्या बँक खात्यांना भेदून लाखो रुपये सायबर गुन्हेगारी टोळीने गायब केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या संदर्भात ५ लोकांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाचही जणांच्या खात्यामधून वेगवेगळ्या वेळी तीन लाख वीस हजार रुपये काढण्यात आले आहेत. “कार्ड क्लोनिंग”च्या माध्यमातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पवईतील तुंगा गाव येथे राहणारे आणि व्यायामाचे प्रशिक्षण देणारे ३५ वर्षीय प्रज्वल शेट्टी यांना १२ एप्रिलच्या पहाटे मोबाइलवर दोन संदेश प्राप्त झाले होते. ज्यामध्ये दहा-दहा हजार रुपये दोन वेळा काढण्यात आल्याचा उल्लेख होता. संदेश वाचत असतानाच, एकामागून एक आणखी काही संदेश त्यांना प्राप्त झाले आणि एकूण एक लाख रुपये काढण्यात आले. कोणीतरी आपल्या खात्यातील पैसे लांबवत असल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेला फोन करून याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांचे एटीएम कार्डवरील व्यवहार बंद करण्यात आले.

‘आम्ही शेट्टी यांची तक्रार नोंद करत असतानाच समीर शहा (४२) नामक व्यक्ती पोलिस ठाण्यात आले. त्यांच्या बँक खात्यामधून सुद्धा एका एटीएम सेंटरमधून एक लाख रुपये काढण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली’ असे पोलिसांनी सांगितले.

शेट्टी आणि शहा यांची तक्रार नोंद झालीच असेल की फिल्टरपाडा येथे राहणारे मंगेश मुसळंबे (२१) यांच्या खात्यातून वीस हजार इतकी रक्कम, मोहम्मद माहीर मुख्तार आलम (२०) यांच्या खात्यातून चाळीस हजार रुपये आणि सौरभ गुप्ता यांच्या खात्यातून साठ हजार रुपये काढण्यात आले असल्याची तक्रार देण्यास ते पोलीस ठाण्यात पोहचले.

११ एप्रिलच्या रात्रीपासून ते १२ एप्रिलच्या सकाळ पर्यंतच्या कालावधीतच पाचही जणांच्या बँक खात्यामधून पैसे काढण्यात आले आहेत. पैसे वेगवेगळ्या ठिकाणाहून काढण्यात आले असले तरी यामागे कार्ड क्लोनिंगचा वापर करणारी एकच टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

‘या सर्वांनी कुठेतरी एकाच ठिकाणी आपले कार्ड वापरले असण्याची शक्यता असू शकते. तिथेच यांची माहिती चोरट्यांच्या हाती लागली असावी आणि त्याचा गैरवापर करत चोरट्यांनी विविध माध्यमातून पैसे लांबवले असावेत. आम्ही सर्व तक्रारदारांच्या बँकांना पत्रव्यवहार करून माहिती मागवली असून, त्याच्या आधारावर तपासाची दिशा ठरेल’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांनी सांगितले.

केवळ ५ तक्रारदारच याला बळी पडले नसून, दिवसभरात जवळपास १६ लोकांनी आपल्या खात्यातून पैसे काढले गेले असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्यात येवून दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व पिडीत हे पवई भागातील असल्याने पवईतील एखाद्या एटीएमसेंटरमध्ये किंवा दुकानात, मॉलमध्ये, स्वाइप मशीनमध्ये कार्ड क्लोनिंग यंत्रणा बसवण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आपले कार्ड स्वाइप करताना योग्य ती खबरदारी घेण्याचा यावी. तसेच असे काही आढळून आल्यास त्वरित पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतर्फे यावेळी करण्यात आले आहे.

‘कार्डांचे क्लोनिंग करणारे ठग एटीएम मशिनमध्ये ज्या ठिकाणी कार्ड आत टाकले जाते त्या ठिकाणी स्किमर बसवतात. कार्ड आत टाकताच मॅग्नेटिक स्ट्रीप स्किमरमध्ये स्कॅन होते. मशिनवरील बाजूस छुपा कॅमेरा बसविला जातो. या कॅमेऱ्यामध्ये कार्डधारकाने दाबलेला पिन नंबर रेकॉर्ड केला जातो. नंतर स्किमरवर स्कॅन झालेल्या मॅग्नेटिक स्ट्रीपची अन्य स्ट्रीपवर प्रिंट बनवून बनावट कार्ड तयार करून, रेकॉर्ड झालेला पिन नंबरच्या साहय्याने पैसे लांबवले जातात. अशाच प्रकारे दुकान, मॉल, हॉटेल, कॉफी शॉपमध्ये स्वाइप मशीनद्वारे डेटा चोरी करून दुसरे कार्ड तयार करून पैसे काढले जातात’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!