चोरी करून पळून गेलेल्या कामगाराला लोणावळ्याच्या हॉटेलमधून अटक

पवईतील एका हॉटेलमधून ५० हजाराची रोकड आणि दुधव्यावसायिकाची मोटारसायकल पळवून नेणाऱ्या चोराला पवई पोलिसांनी अटक केली आहे. कमरूल इस्लाम जुबेद अहमद तफादार (३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा नेपाळचा आहे. लोणावळा येथील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीला गेलेली ऍक्टिवा मोटारसायकल (एम एच ०३ सी डब्ल्यू ८३१६) पोलिसांनी हस्तगत केली आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमरूल हा गेल्या वर्षभरापासून जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड़वर, गणेशनगर येथे असणाऱ्या ३० डिग्री या हॉटेलमध्ये किचन आणि स्टॊक मॅनेजर म्हणून काम करत होता. दिवसा पवईत घराघरात दूध टाकणाऱ्या व्यावसायिकाजवळ तो घरोघरी दूध टाकण्याचे काम करत असे.

११ जुलै रोजी कमरूल दोन्ही ठिकाणी कामासाठी पोहचलाच नाही. याबाबत चौकशी केली असता तो गायब असल्याचे दोन्ही मालकांच्या लक्षात आले. जाताना हॉटेलमधून ५० हजाराची रोकड आणि दूध टाकण्यासाठी सुविधा म्हणून देण्यात आलेली ऍक्टिवा मोटारसायकल सुद्धा घेऊन फरार झाल्याचे लक्षात येताच दोन्ही मालकांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

‘आमचा तपास सुरु असताना आमच्या विशेष सूत्राने कमरूल लोणावळ्यात एका हॉटेलमध्ये कामाला असल्याची माहिती दिली. ज्याच्या आधारावर खात्री करून घेत आम्ही लोणावळा येथील एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

पवई पोलिसांनी चोरून नेलेली ऍक्टिवा मोटारसायकल लोणावळा येथून आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केली आहे. चैन, मजा-मस्ती करण्यासाठी त्याने ही चोरी केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

‘भादंवि कलम ३८१ आणि ४०६ अनुसार विविध दोन गुन्ह्यात त्याला अटक करून कोर्टात हजर केले असता, प्रथम ६ दिवसांची पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे’, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!