चोरीत मौल्यवान वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून गॅस सिलेंडर पळवले; दोघांना अटक

अटक आरोपी सादिक उर्फ अव्वा अक्काफी शेख (२३) याला पवई पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथक कोर्टात घेऊन जाताना.

चोर चोरी करायला गेला मात्र घरात काहीच सापडले नसल्यामुळे काय चोरी करावे याचा प्रश्न पडलेल्या चोरट्याने चक्क घरातील २ गॅस सिलेंडर पळवून नेल्याची घटना पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी माग काढत सादिक उर्फ अव्वा अक्काफी शेख (२३) आणि सलमान उर्फ दस्तगीर अस्लम खान (२८) याला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे.

अटक आरोपी चोरीला गेलेल्या सिलेंडरसह

पवईतील मिलिंदनगर येथील झोपडपट्टीत राहणारे सोपान भंडगे परिवारासह रविवारी आपल्या नातेवाईकांकडे काही कामानिमित्त गेले होते. सोमवारी ते परतले तेव्हा त्यांच्या घरातील गॅस सिलेंडर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात शोधाशोध केल्यावर घरातील २.३ ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील गायब असल्याचे सुद्धा त्यांच्या लक्षात आले. आसपास चौकशी करूनही काहीच हाती नाही लागल्यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद केली होती.

घराचा पंचनामा करताना दरवाजा तोडून चोरांनी घरात प्रवेश केल्याचे आढळून आले होते. शिवाय चोर हे पाळत ठेवून असल्याचे शक्यता पाहता आम्ही आमच्या खबऱ्यांचे जाळे पसरवले होते.

‘आमच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही मिलिंद नगर येथील सलमान उर्फ दस्तगीर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सादिक उर्फ अव्वाच्या मदतीने चोरी केली असल्याची त्याने कबुली दिली. गुरुवारी सादिकला आम्ही त्याच्या लपून बसलेल्या ठिकाणावरून अटक केली’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ नुसार गुन्हा नोंद करून सादिकला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes