मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक

साकीनाका येथून चोरीला गेलेली काळ्या रंगाची पल्सर २२० मोटारसायकल सह ४ मोटारसायकल पोलिसांनी केल्या हस्तगत

मोटारसायकल चोरी

सुरक्षित पार्क करून ठेवलेल्या मोटारसायकल वर पाळत ठेवून संधी साधत बनावट चावीने तिची चोरी करून अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखा कक्ष ११ने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यातील एक साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील तर दुसरी एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतून चोरीला गेलेली आहे. थोडाफार बदल करून बनावट नंबर प्लेट लावून या मोटारसायकली कॉलेज तरुणांना विकल्या जात.

मुंबईच्या विविध भागातून मोटारसायकली चोरी करून त्यात थोडेफार बदल करत कॉलेज तरुणांना विकणारी एक टोळी परिसरात कार्यरत होती. ही टोळी एका गाडीच्या विक्रीसाठी मालाड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा कक्ष ११च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने बुधवार, १५ जुलै रोजी त्यांनी परिसरात पाळत ठेवली असताना, दोन तरुण एक्तीवा मोटारसायकल क्रमांक एमएच ०२ ईडी ५८७३ वरून तिथे संशयास्पद फिरताना आढळले. तरुणांना पकडून चौकशी केली असता ती मोटारसायकल चोरीची असल्याचे समोर आले. सहार पोलीस ठाणे हद्दीतून ती मोटारसायकल चोरी करण्यात आली असून, तिथे भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद आहे.

“त्यांच्या चौकशीत त्यांनी अजून चार मोटारसायकली चोरी केल्या असून, त्यातील एक विकल्याचे सांगितले. आम्ही सदर गुन्ह्यात ४ मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहेत,” असे याबाबत बोलताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपींकडून पोलिसांनी साकीनाका येथून चोरीला गेलेली काळ्या रंगाची पल्सर २२० मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ एजी ६१८९; एमआयडीसी पोलीस ठाणेच्या हद्दीतून चोरीला गेलेली सफेद रंगाची यामाहा कंपनीची मोटारसायकल क्रमांक एमएच ०२ एफ४२२२; आरे कॉलोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली पल्सर २२० मोटारसायकल क्रमांक एमएच ०२ ईबी ७५५८ आणि डी एन नगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेली एक्सेस मोटारसायकल क्रमांक एमएच ०२ एफएच४२५९ हस्तगत केल्या आहेत.

कॉलेज तरुणांना कमी किंमतीत विकल्या जातात मोटारसायकली

अटक केलेल्या तरुणांची एक टोळी आहे ते विविध मेक आणि मॉडेलच्या मोटारसायकली चोरी करतात. चोरी केलेल्या मोटारसायकलीमध्ये छोट्या प्रमाणात बदल करून त्यांना नंतर बनावट नंबरप्लेट लावतात. यानंतर कॉलेज तरुणांना हेरून त्यांना या मोटारसायकली कमी किंमतीत विकल्या जातात, असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या या टोळीच्या १९ वर्षीय तरुण, राहणार सहारा हॉटेलजवळ गोरेगाव पूर्व, १९ वर्षीय तरुण भगतसिंग नगर गोरेगाव पश्चिम येथे राहणारा तरुण आणि १६ वर्षीय बालक असे तिघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना साकीनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!