आयआयटी  कॅम्पसमधून वायर चोरी करणाऱ्या टोळीसह भंगारवाल्याला अटक

आयआयटी पवई कॅम्पस भागातील सुरक्षा व्यवस्थेला भेदत, येथील तांब्याच्या वायर चोरी करणाऱ्या टोळीच्या तीन लोकांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शुक्रवारी उशिरा अटक केली आहे. या गुन्ह्यातील सगळा चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याला सुद्धा पवई पोलिसांनी अटक करत संपूर्ण चोरीचा माल हस्तगत केला आहे.

राहूल नारायण तायडे (२६), संतोष बाबासाहेब गोरे (२६), विनोद राजाराम गुलगे (२६) सर्व राहणार फुलेनगर, पवई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात चोरीचा माल खरेदी करणारा भंगारवाला संजय राजमल जैन (४४) याला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आयआयटी कॅम्पस भागात तांब्याच्या वायर चोरीच्या घटना वाढल्याची तक्रार येथील सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. याची दखल घेत सुरक्षा रक्षकांनी दक्षता वाढवली होती, मात्र त्यानंतरही मोठ्या शिताफीने ते चोरी करण्यात यशस्वी होत होते.

“आयआयटी सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार दाखल करत आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिले होते, मात्र एवढ्या मोठ्या परिसरात असणाऱ्या या कॅम्पस भागातील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी तपासणे मोठे दिव्य होते,”

सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयित निवडून पोलिसांनी खबऱ्यांना त्यांच्यावर पाळत ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती. “आमच्या एका खबऱ्याने दिलेल्या पक्क्या माहितीच्या आधारे आम्ही आरोपितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, असे याबाबत बोलताना पवई ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

“अटक आरोपींपैकी राहूल तायडे हा कॅम्पस भागात इंटरनेट कनेक्शनच्या वायरी बदलण्याचे आणि दुरुस्तीचे कंत्राट पद्धतीने काम करत असे. यामुळे आत पडून असणाऱ्या वायरींची त्याला माहिती होती. याचाच फायदा घेवून आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून तो ह्या चोऱ्या करत होता”, असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुनसे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड, पोलीस नाईक दामू मोहळ, पोलीस शिपाई अशोक परब, पोलीस शिपाई, गणेश कट्टे, पोलीस शिपाई सचिन गलांडे यांनी ही कारवाई केली.

पवई पोलिसांनी भादंवि कलम ३७९, ४११ सह ३४ नुसार आरोपीना अटक केली असून, उद्या (शनिवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!