जनावरांची दूधक्षमता वाढविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसीन’ औषधाचा मोठा साठा पवईत पकडला

दूध देणाऱ्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसीन’ नामक औषधाचा मोठा साठा मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पवई येथे पकडला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ‘ऑक्सिटोसीन’च्या दीड हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. या औषधाचा मुंबईतील विविध तबेल्यांमध्ये पुरवठा करण्यात येणार होता. नजीब खोटाल, अनिस खांदे आणि मासी सादिक खोत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ऑक्सिटोसीन औषध हानिकारक असल्याने याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या औषधाच्या वापरामुळे दूध देणाऱ्या जनावरांची दूध क्षमता वाढत असल्याने याचा चोरून वापर तबेल्यांमध्ये होत आहे. या औषधामुळे जनावरांच्या गर्भाशयावर विपरीत परिणाम असून, निघणारे दूषित दूध नागरिकांच्या आरोग्यासही हानीकारक आहे.

मुंबईतील विविध तबेल्यात चोरट्या मार्गाने येणाऱ्या या औषधाची मुंबईत बेकायदेशीरपणे विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारावर गुन्हे शाखा १० पथकाने पवईतील विविध रस्त्यांवर पाळत ठेवून सापळा रचला होता.

‘खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका टॅक्सीला अडवून त्याच्यात झाडाझडती घेतली असता आम्हाला ऑक्सिटोसीनच्या १००० बाटल्या असणारे काही बॉक्स मिळून आले, असे पोलिस सूत्रांनी याबाबत बोलताना सांगितले.

ऑक्सिटोसीनची बेकायदा वाहतूक करणाऱ्या नजीब खोटाल आणि अनिस खांदे या दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता मासी सादिक खोत हा या औषधांचा साठा आपल्या गोडाऊनमध्ये करत असून, तिथूनच संपूर्ण पुरवठा केला जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी खोत यालाही अटक करून त्याच्या गोडाऊनमधून ऑक्सिटोसीनच्या आणखी ५०० बाटल्या जप्त करण्यात केल्या आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देवून, त्यांच्या तक्ररीवरून पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!