पवईत आतापर्यंत ६५ जणांना कोरोनाची लागण; एकाच दिवसात ९ बाधितांची वाढ

पवईत आतापर्यंत ६५ जणांना कोरोनाची लागण

पवईत कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवार ७ मे पर्यंत पवईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे बुधवारी एका दिवसात यात ९ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. पाठीमागील काही दिवस केवळ चाळ सदृश्य लोकवस्तीतच कोरोना बाधित मिळत होते, मात्र आता इमारतीमध्ये सुद्धा कोरोना बाधित मिळून येत आहेत. पवई विहार, रहेजा विहार, लेकहोम, नवीन म्हाडा आणि नहार भागात सुद्धा नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यामुळे आता या विषाणूपासून कोणीच वाचू शकले नसल्याचे उघड झाले आहे.

पालिका ‘एस’ विभागांतर्गत येणाऱ्या पवई परिसरात हिरानंदानी गार्डन्स येथील इमारत भागातून कोरोना बाधित रुग्ण मिळण्याची सुरुवात झाली होती. मात्र सोसायटी प्रशासन आणि शासकीय यंत्रणा यांच्या योग्य खबरदारीमुळे इमारत भागात कोरोनाला पोहचण्यापासून थोपवण्यात यश मिळाले होते. मात्र पाठीमागील दोन दिवसात इमारत भागात सुद्धा कोरोना बाधित मिळून येत असल्याने आता हा विषाणू पुन्हा इमारतींपर्यंत पोहचला असल्याचे नाकारता येणार नाही.

पाठीमागील काही दिवसात इमारत भागात मिळणाऱ्या रुग्णांच्या ट्रेसिंगमध्ये हे बाधित आपली इमारत किंवा परिसर सोडून बाहेर कमी प्रमाणात गेलेले समोर आले आहे. सामान खरेदीसाठी एक-दोन वेळा बाहेर पडणे किंवा बाहेरून सामान, जेवण घरी मागवणे एवढ्याच गोष्टी यांच्याबाबतीत संशयास्पद ठरत आहेत. यांना नक्की कशामुळे या विषाणूंची बाधा झाली याची प्रशासन माहिती मिळवत आहे.

छायाचित्रे: रमेश कांबळे

१६ मार्चला आणि ३१ मार्चला पवईत इमारत भागात कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले होते. त्यानंतर पवईतील विविध चाळ सदृश्य भागांमध्ये कोरोनाने आपले पाय पसरत जवळपास ४० पेक्षा अधिक लोकांना आपल्या पकडीत घेतले. यातील १५ पेक्षा अधिक बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर काहींना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दोन दिवस वेग मंदावला

पाठीमागील आठवड्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह मिळून येत होते. मात्र, सोमवार आणि मंगळवार हा वेग मंदावला. सोमवारी ४ मे रोजी आयआयटी येथील चाळ सदृश्य वस्तीत ५५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. यानंतर मंगळवारी आरे कॉलोनी रोडवर असणाऱ्या फिल्टरपाडा भागातील चाळसदृश्य लोकवस्तीत एक ५० वर्षीय महिला आणि एक ४० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहेत.

एकाच दिवसात ९ रुग्णांची वाढ

बुधवारी, ६ मे रोजी मात्र कोरोना बाधितांच्या संख्येने पुन्हा उसळी घेत ९ कोरोना पॉझिटिव्ह या दिवशी पवईत मिळून आले आहेत. पवई विहार येथील एका रहिवाशी इमारतीत ४५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे समोर आले. या पाठोपाठच एलएंडटी येथे असणाऱ्या नवीन म्हाडा भागात ५४ वर्षीय इसम कोरोना बाधित असल्याचे उघड झाले, ते बृहन्मुंबईमहानगर पालिकेत घनकचरा विभागात कार्यरत आहेत. या पाठोपाठच लेकहोम भागात राहणारी एक महिला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह मिळून आली आहे. सफायर लेकसाईट इमारतीत सुद्धा एक कोरोना बाधित याच दिवशी मिळून आला, तर रहेजा विहार येथील एका रहिवाशी इमारतीत राहणारे ५५ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

बुधवारी, ६ मे रोजी पवईतील चाळसदृश्य भागात सुद्धा काही रुग्णांची नोंद झाली. आयआयटी येथील गोखलेनगर भागात राहणारा २५ वर्षीय तरुणाला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्याला काही दिवसांपूर्वी मार लागल्याने कणकण जाणवत असल्याने त्याने तपासणी करून घेतली होती. या पाठोपाठच आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर भागात एक तरुण तर एक महिला यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तुंगागाव येथील खालचा तुंगा येथील एक ४० वर्षीय इसमास सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.

(येथे देण्यात आलेल्या बाधितांची संख्या ही पालिका आणि पोलीस यांच्या नोंदीतून घेण्यात आलेली आहे.)
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!