चोरट्यांनी पळवले शौचालयातील नळ

प्रातिनिधिक

सोने, हिरे, चांदी आणि मौल्यवान वस्तू पळवणाऱ्या चोरट्यांनी आता हाताला लागेल ते पळवायला सुरुवात केली असून, पवईतील एका घटनेत तर चोरट्यांनी चक्क शौचालयातील नळ पळवल्याची घटना पवईत घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली असून, इतर चोरीच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग मिळून आला आहे. सुनुज सरोज (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पवई परिसरात पाठीमागील काही दिवस चोरांनी उच्छाद मांडला आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या परिसरात चोरीची घटना घडू लागल्या आहेत. कोरोना काळात अनेक आरोपींची सुटका झालेली आहे. अशात हे सुटलेले चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून, त्यांनी या कोरोनाच्या काळात हाताला लागेल ते चोरायला सुरुवात केली आहे.

“पवई प्लाझा येथील शौचालयातील वेस्टर्न टोयलेटमधील नळ चोरी केल्याची तक्रार आमच्या पोलीस ठाण्याला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरु होता, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “आम्ही परिसरातील सिसिटिव्ही फुटेज तपासत असताना दिसून आलेला संशयित हा सायकल, टिव्ही आणि इतर चोरीच्या गुन्ह्यात सुद्धा सहभागी असल्याचे उघड झाले होते. त्या अनुषंगाने तपास करत आम्ही त्याला परिसरात दुसऱ्या चोरीच्या उद्देशाने आले असताना अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.”

पिगीबँक पळवली

चोरटे केवळ टिव्ही, नळ यावरच थांबले नसून, आयआयटी भागात नुकत्याच घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंसह मुलांची पैशांची पिगीबँक सुद्धा पळवली आहे. असेही यावेळी बोलताना पोलिसांनी सांगितले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!