शाळा आणि हिरानंदानी प्रशासनाच्या सामंज्यस्यातून हॉस्पिटल जवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला; एस एम शेट्टी शाळेजवळचा निर्णय कधी?

वाहतूक नियोजनावर चर्चा करताना हिरानंदानी समूहाचे सुदीप्ता लाहिरी, पोद्दार शाळेचे शिंदे आणि कर्मचारी वाहतूक नियोजनावर चर्चा करताना.

सकाळ, दुपार, संध्याकाळ असे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे पवईकरांच्या डोक्याचा ताप आणि हिरानंदानी पवईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बनलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल येथील चंद्रभान शर्मा चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पोद्दार शाळा प्रशासन आणि हिरानंदानी प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून संपुष्टात आलेला आहे. आता एसएम शेट्टी शाळेजवळ होणारया वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी मिटणार असा प्रश्न पवईकर उपस्थितीत करत आहेत.

जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर चालू असलेल्या मेट्रो-६चे काम आणि वाहतूक कोंडी ही समस्या पवईकरांसाठी त्रासदायक ठरत असतानाच हिरानंदानी हॉस्पिटल समोर आणि जलवायू ते सिल्वर ओक या भागात शाळेत येणाऱ्या वाहनांना रस्त्यांवर पार्क करून त्यात आणखी भर टाकली जात असते.

चांदिवली, हिरानंदानी, आयआयटी परिसराला जोडणारा हिरानंदानी मार्ग हा एकमेव दुवा आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे पाठीमागील काही वर्षात या परिसराला वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासले आहे. जेव्हीएलआर मार्गावर वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे याचा मोठा भार हिरानंदानीतून बाहेर पडणाऱ्या मार्गावर पडला आहे. परिसरातील वाढती वाहतुकीची कोंडी पाहता स्थानिक भागात प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी आयआयटी – जीएल कंपाऊंड – हिरानंदानी हॉस्पिटल – अक्षरधाम मंदिर – एमटीएनएल मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, शाळा सुरु झाल्यापासून हिरानंदानी हॉस्पिटल समोर असणाऱ्या पोद्दार स्कूल, आणि हिरानंदानी समूहाच्या नव्याने सुरु झालेल्या पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांना घेवून येणाऱ्या खाजगी बसेस आणि पालकांच्या गाड्या संपूर्ण रस्त्यावर उभ्या राहत असल्याने या भागाला वाहतूक कोंडीने वेढले होते.

या समस्येबत आवर्तन पवईने बातमी सोबतच वेळोवेळी हिरानंदानी व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधत या प्रश्नांवर प्रकाश टाकला होता.

एस एम शेट्टी शाळेजवळ १४ जानेवारी २०१९ रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता असणारी वाहतूक कोंडी.

आवर्तन पवईच्या या प्रयत्नांना यश आले असून, आता हिरानंदानी रूग्णालयासमोरील वाहतूक कोंडीतून पवईकरांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात बोलताना हिरानंदानी समूहाचे सुदिप्ता लाहिरी यांनी सांगितले की “येथील ९० फीट रोडवर दिवसभर बाहेरील वाहने, ट्रक, टंकर उभे केले जात होते. या जागेचा आम्ही सदुपयोग करण्याचे ठरवत आता आम्ही शाळेत येणाऱ्या खाजगी बसेस आणि पालकांच्या गाड्यांना तिथे उभी करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी होत इतर वाहनांना जाण्यास जागा उपलब्ध झाली आहे.”

“पोद्दार् स्कूल व्यवस्थापनाचे शिंदे म्हणाले की, आमच्या शालेय बसेस शाळेच्या प्रांगणात उभ्या केल्या जातात. मुळात प्रश्न होता तो खाजगी वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांचा. त्यांचा विचार करता आम्ही शाळेच्या दुसऱ्या बाजूने ९० फिट रोडकडे उघडणारे छोटे गेट उघडे करणार आहोत. यासाठी हिरानंदानी प्रशासनाशी आमची चर्चा सुरु आहे. सध्या आम्ही सर्व पालकांना सूचना दिल्या आहेत की त्यांनी ९० फिट रोडवर आपली वाहने उभी करून विद्यार्थ्यांना पुढील गेटपर्यंत चालत घेवून येवून शाळेच्या परिसरात प्रवेश करावा. वाहतूक नियंत्रणासाठी आम्ही काही वॉर्डंन्सची नियुक्ती सुद्धा केली आहे.

“वाहतूक कोंडीची मोठी समस्या विशेषतः शाळा भरण्या आणि सुटण्याच्या वेळातच उद्भवते. त्यामुळे आम्ही केलेल्या बदला सोबतच हिरानंदानी कमांडो आणि सुरक्षा कर्मचाऱ्याना या काळात वाहतूक नियंत्रण आणि मुलांच्या सुरक्षेच्या माध्यमातून तिथे कर्तव्य देण्यात आलेले आहे.” असेही लाहिरी यांनी याबाबत बोलताना सांगितले.

हिरानंदानी हॉस्पिटल येथील वाहतुकीची समस्या मिटली असली तरी एसएम शेट्टी शाळेच्या सिल्वर ओक ते जलवायू विहार या भागात उभ्या राहणाऱ्या बसेसमुळे येथील समस्या अजूनही कायम आहे. “या बद्दल शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असताना त्यांनी यावर उपाय शोधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतीची खबरदारी घेतली गेली नसून, आजही बसेसची मोठीच्या मोठी रांग रस्ता अडवून या भागात उभी असते. शाळा सुटण्याच्या वेळेस तर संपूर्ण रस्ता दुहेरी रांगेत उभे राहून अडवला जातो. वाहने जायला जागाच उरलेली नसते, त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडीची समस्या नियमित होत आहे.” असे याबाबत बोलताना पवईकरांनी सांगितले.

“साकीनाका वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत सकपाळ यांच्याकडे ही समस्या मांडली असता त्यांनी सुद्धा याकडे कानाडोळा केला असल्याने ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे.” असेही याबाबत बोलताना नागरिकांनी सांगितले.

हिरानंदानी हॉस्पिटल येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला, मात्र एसएम शेट्टी शाळेजवळ होणारया वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी मिटणार असा प्रश्न आता पवईकर उपस्थितीत करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes