पवईत डिलेव्हरी बॉयच्या सामानातील आयफोन, स्मार्टवॉच, महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या तिकडीला अटक

गणेशोत्सव नुकताच पार पडला असून, दिवाळी – दसरा काही दिवसांवर आलेले आहेत. अशातच विविध बाजारांसह ऑनलाईन असणाऱ्या अनेक शॉपिंग साईटवर वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. त्यातच या शॉपिंग साईटस घरबसल्या खरेदी करण्यासह वस्तू घरपोच पोहचवण्याच्या सुविधा देत असल्यामुळे अनेक लोक ऑनलाईन खरेदीचा आनंद घेत आहेत. मात्र हे सामान खरेदीदाराच्या घरापर्यंत पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या डोक्याला मात्र हे सामान डिलिव्हरीला गेले असताना चोरी होत असल्याने मोठा त्रास होत आहे.

पवई परिसरात सुद्धा अशा काही घटना घडल्या असून, असे सामान चोरी करणाऱ्या त्रिकुटाला पवई पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून बेड्या ठोकल्या आहेत.

नबी अहमद मो. इकबाल शेख (वय २१ वर्ष), फैसल इकरार खान (वय २७ वर्ष), अदनान करीम खान (वय २० वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, सर्व आरोपी पवईतील फिल्टरपाडा भागातील राहणारे आहेत.

फिर्यादी हंस रजा मणियार (३८ वर्ष) हे इकॉम एक्सप्रेस येथे विविध ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे सामान डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत. २७ तारखेला दुपारी १ वाजता ते हिरानंदानी गार्डन पवई येथील ब्रेंटवूड इमारत येथे पार्सल देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या सामनाची बॅग गेट बाहेर ठेवली होती.

इमारतीत पार्सल देवून आल्यावर इतर सामान ठेवलेली बॅग घेवून ते निघाले असता त्यांच्या बॅगेतील काही सामान नसल्याचे त्यांना जाणवले. “बॅगेतील काही लेडीज कपडे, टी शर्ट, चप्पल, वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्ट वॉच, ब्लु टूथ गायब होते,” असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे. यासंदर्भात चोरीचा गुन्हा दाखल करत पवई पोलिसांनी तपास सुरु केला होता.

“सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही इमारत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा गुन्हा ३ व्यक्तींनी मिळून केल्याचे समोर आले होते. त्या अनुषंगाने संशयित इसमांच्या येण्याच्या व जाण्याच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सदर तीन आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. आम्ही विविध परिसरातील खबऱ्यांचे जाळे कार्यरत केले होते,” असे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, “तांत्रिक तपास आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपी निष्पन्न करून त्यांना फिल्टरपाडा परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.”

पोलिसांनी अटक आरोपींकडून या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या लेडीज कपडे, टी शर्ट, चप्पल, वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्ट वॉच, ब्लु टूथ अशा सामानासह अजून एका गुन्ह्यात चोरी केलेले एक आय फोन ११, एक रियलमी कंपनीचा फोन, लेडीज, जिन्स व मुलांचे कपडे असा एकूण १,२२,५४७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेली ऍक्टिवा मो. सा. क्र. एमएच ०३, डीजे ७७२० देखील हस्तगत केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवई पोलीस ठाणे बुधन सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस हवालदार टिळेकर, येडगे, पोलीस नाईक झेंडे, जाधव, पोलिस शिपाई सुरवाडे, राठोड यांच्या पथकाने करून गुन्हा उघडकीस आणला.

भादवि कलम ३७९, ३४ सह नोंद गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, सदर आरोपींनी अजून कुठल्या परिसरात अशा प्रकारे चोरी केली आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: