जेव्हीएलआरवर अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

गुरुवारी (१० ऑक्टोबर) जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर पंचकुटीर येथे झालेल्या अपघातात मोटारसायकलवरून जात असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना पवई परिसरात घडली. सदाशिव येरम (२३) आणि शैलेश मिडबावकर (२३) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांचा अजून एक मित्र अनिकेत महेश जांभळे (२१) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरानंदानी येथील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करणारे तीन तरुण काल संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पवईकडून मोटारसायकलवरून (एमएच ०२ ईटी १९६५) भांडूपच्या दिशेने जात होते. पंचकुटीर येथे गणेशघाटाजवळ उजवीकडे वळण घेत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला (एमएच ४३ बिजी ४६९४) धडकल्याने तिघेही गाडीवरून खाली पडले.

सिमेंटमिक्सर चालकाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच यातील एक तरुण चाकाखाली आला होता, तर दोन तरुण गंभीररित्या जखमी होऊन बाजूला पडले होते.

‘आम्हाला माहिती मिळता घटनास्थळी धाव घेत यातील दोन जखमी तरुणांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. तर एकाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले ज्याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

संध्याकाळी उशिरा हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.

‘जेव्हीएलआरवर सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. यामुळे रस्ता खूपच अरुंद झाला असून, अनेक ठिकाणी धोकादायक वळणे निर्माण झाली आहेत. अनेकवेळा येथे पाठीमागून वळण घेत असणाऱ्या वाहनांना पुढे कोणते वाहन आहे हे दिसून येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता या मार्गावर वाढली आहे,’ असेही याबाबत बोलताना एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना धास्ती निर्माण व्हावी यासाठी कठोर नियम करण्यात आले असून, मोठा दंड सुद्धा आकारला जात आहे. मात्र, त्यानंतरही तरुणांमध्ये याबाबत भीती नसल्यामुळेच नियमांचे उल्लंघन करत रस्त्यांवरून प्रवास केल्यामुळेच असे अपघात घडत आहेत.’

अपघातानंतर पळून गेलेल्या सिमेंट मिक्सरचालकाचा पवई पोलिस शोध घेत असून, शेवटची बातमी हाती आली तेव्हापर्यंत चालकाला अटक करण्यात आली नव्हती.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!