हिरानंदानी कमांडोंनी पकडले दोन लॅपटॉप चोरांना

अटक आरोपी – वासिम सय्यद (४८) आणि अन्वर शेख (४५)

मुंबईतील विविध भागात गाड्यांमध्ये असलेले लॅपटॉप आणि किंमती वस्तू गाड्यांच्या काचा फोडून लांबवणाऱ्या टोळीतील दोघांना हिरानंदानी येथे चोरी करताना एसटीएफ कमांडोनी पकडून पवई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वासिम सय्यद (४८) आणि अन्वर शेख (४५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून, ते दोघेही मालाड परिसरात राहतात. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच ०२ एसी ४६२७ सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

गेल्या काही महिन्यात पवईमध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांमधून लॅपटॉप आणि किमती वस्तू चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यातील काही गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या आहेत, तर काहींनी तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याने या चोरट्यांचे चांगलेच फावले होते.

गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल

हिरानंदानी भागात सुद्धा अशा काही घटना घडल्यानंतर येथील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या कमांडोना याला रोखण्याचे काम सोपवण्यात आले होते.

“आमचे एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स) पथक दुपारी गस्त घालत असताना, एका टिमला अटलांटिक इमारतीच्या येथे उभी असणाऱ्या कार क्रमांक एमएच ०३ बिएस ३२११ जवळ दोन इसम संशयास्पदरित्या वावरत असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी तिथून दूर उभे राहून त्यांच्यावर पाळत ठेवत आपल्या इतर सहकार्यांना सुद्धा याबाबत माहिती दिली.” असे याबाबत बोलताना एसटीएफ प्रमुख चंद्रसेन सिंग यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “कोणी आसपास नाही याची संधी साधत यातील एकाने टोकदार वस्तूच्या साहय्याने गाडीच्या डाव्या बाजूची पाठीमागील काच फोडून पुढे निघून गेला. काही क्षणातच दुसऱ्या एका इसमाने गाडीत हात घालून गाडीतून बॅग काढली. दोघे पलायन करायच्या तयारीत असतानाच आमच्या पथकाने त्यांना पकडले.”

अटक आरोपींसोबत एक रिक्षा चालक सुद्धा या गुन्ह्यात सामिल असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत असून, तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

दोन्ही आरोपींना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, भादवि कलम ३७९, ४२७, ३४ नुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. दोघांच्या विरोधात इतर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे नोंद आहेत.

“हिरानंदानीत पकडले जाण्यापूर्वी दोन दिवस आधी सुद्धा त्यांनी पवईमध्ये अशाच प्रकारे हात साफ केला होता आणि पुन्हा चोरी करण्यासाठी तिथे आले असताना आमच्या हाती सापडले” असे याबाबत बोलताना एसटीएफ टिमने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , ,

One Response to हिरानंदानी कमांडोंनी पकडले दोन लॅपटॉप चोरांना

  1. Nitesh mhadgut June 8, 2018 at 9:33 pm #

    Gr8 job..

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes