मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून पवई तलावात ढकलले

पवई तलावात इसमांना बेकायदेशीर मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून त्याला पवई तलावामध्ये ढकलून दिल्याची घटना घडली आहे. शेरबहादूर खान असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. सुरक्षा रक्षकाने यासंदर्भात पवई पोलिस ठाणे गाठत दोघांविरूद्ध तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असून, गुन्ह्यात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई तलावाजवळ तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक खान याला दोन इसम तलावाच्या कडेला मासेमारी करताना दिसले. पाठीमागील दोन वर्षात सहापेक्षा अधिक जणांच्या मृत्यूच्या मालिकेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांनी पवई तलावात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. या नियमानुसार खान यांनी त्यांना मासे पकडण्यास मनाई करत परिसर सोडायला सांगितले. मात्र त्या दोघांनी खान बरोबर वादविवाद करत याचे गंभीर परिणाम होण्याची धमकी देऊन त्याच्यावर हल्ला चढवला.

खानने शांत राहत त्यांना मासेमारी करण्यास मनाई करत निघून जाण्याची विनंती केली. मात्र ते जाण्यास तयार नसल्याने त्याने मी पोलिसांना कळवतो असे म्हणताच दोघांनी त्याला पवई तलावात ढकलून तेथून पळ काढला, असे याबाबत खान याने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

या संदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. “आम्ही दोघांचा शोध घेत आहोत”, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes