संघर्षनगरमध्ये सांडपाण्यात धुतल्या जातात भाज्या; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

संघर्षनगरमधील लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भाजीवाल्याला मनसेने शिकवला धडा

चांदिवली, संघर्षनगर येथे गटाराच्या पाण्यात भाज्या धुवून त्या विक्रीस ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे. येथील एका भाजीवाल्याचा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार मनसे सैनिकांनी उघडकीस आणला आहे.

संघर्षनगर येथील इमारत क्रमांक ११ येथे भाजी विक्री करणारा एक भाजी विक्रेता गटारात जाणाऱ्या सांडपाण्यात भाज्या धुवून त्या विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

“आम्हाला एक व्यक्ती सांडपाण्यात भाज्या धुवून परिसरात विक्री करत असल्याची माहिती आमच्या काही कार्यकर्त्यांनी दिली होती. बुधवारी आम्ही त्या परिसरात जावून पाहिले असता एक व्यक्ती आपल्या मुलासह घाणपाण्यात भाज्या धुवत असल्याचे दिसून आले” असे याबाबत बोलताना मनसे उप शाखा अध्यक्ष राजू कोळी यांनी सांगितले.

याचा पुरावा म्हणून भाजी विक्रेता घाणपाण्यात भाज्या धुवत असल्याचा व्हिडीओ काढण्यात आला होता. आपले पितळ उघडे पडत असल्याचे लक्षात येताच भाजी विक्रेत्याने तेथून पळ काढला. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल माध्यमात तो व्हिडीओ टाकण्यात आला होता.

मनसे उपशाखा अध्यक्ष राजू कोळी, शिवसेनेचे कृष्णा खडतरे, उपशाखा अध्यक्ष नितीन गवळी, अमित जोशी, साई कुरतडकर राकेश रहाटे, सचिन खवले यांनी तो भाजी विक्रेता ओमप्रकाश केवट याचा शोध घेवून, संघर्षनगर इमारत क्रमांक १२ येथून त्याला पकडून साकीनाका पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलीस ठाण्यात त्याने आपल्या या कृत्याबद्दल माफी मागून, पुन्हा अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळणार नसल्याची कबुली दिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले आहे.

‘सदर भाजी विक्रेत्याला या पूर्वीही अशाच प्रकारे कृत्य करताना पकडण्यात आले होते. त्यावेळीही त्याने माफी मागितल्यानंतर समज देवून सोडण्यात आले होते’ असेही याबाबत बोलताना काही स्थानिकांनी सांगितले.

यावेळी आम्ही त्याला सोडले आहे. मात्र तो पुन्हा आम्हाला अशा प्रकारचे कृत्य करताना आढळून आल्यास लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या भाजी विक्रेत्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू, असेही याबाबत बोलताना मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!