स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० अंतर्गत पवईतील भिंती चिञमय

@रमेश कांबळे, सुषमा चव्हाण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०’ अंतर्गत पवईतील पदपथाला लागून असणाऱ्या संरक्षक भिंतीवर आकर्षक चिञे काढून त्यातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. पालिकेच्या ‘एस’ विभागान्तर्गत तयार होत असलेल्या या चित्रनगरीमुळे पवईतील रस्ते चित्रमय तर होणारच आहेत, मात्र यातून विविध संदेश सुद्धा नागरिकांना दिले जात आहेत.

विविध पक्ष, संघटनांच्या भिंतीवरील जाहिराती आणि पोस्टरबाजीमुळे विद्रुप झालेल्या पवईतील भिंतींना आता वेगळाच साज मिळणार आहे. पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत येथील भिंतींवर ‘पाणी वाचवा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका’, ‘स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर’, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असे संदेश या चित्रांच्या माध्यमातून नागरिकांना देवून त्यांच्यात जनजागृती सुद्धा केली जात आहे.

पवई स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० “आम्ही नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ घोषणेला पवईच्या कानाकोपऱ्यात पोहचवत असून, आपला परिसर ‘स्वच्छ पवई’च्या दिशेने घेवून जाण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहोत. पालिकेच्या स्वच्छ अभियान २०२० मोहिम अंतर्गत परीसरात जिथे-जिथे कचरा टाकला जातो त्या ठिकाणी, रस्त्याच्या कडेला व पोस्टरबाजी मुळे विद्रुप झालेल्या भिंती आणि पवईतील विविध शाळांच्या बाहेरील भिंतींवर आकर्षक चित्रे काढून पवईकरांना जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे,”  असे आवर्तन पवईशी याबाबत बोलताना स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१८ साली राज्याच्या राजधानीच्या श्रेणीत मुंबईला पहिले स्थान मिळाले होते. तिथेच केंद्र सरकारच्या २०१९ सालच्या स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईला घसरंडी मिळत ४९व्या क्रमांकावर फेकले होते. महाराष्ट्रातून नवीमुंबई शहराने फक्त पहिल्या दहात आपले स्थान निर्माण केले होते.

पवई स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० पवईच्या भिंती आकर्षक करण्यासाठी पालिका पाऊले उचलत आहे त्याचा आनंदच आहे. मात्र जिथे ही योजना राबवली जात आहे त्या संपूर्ण आयआयटी भागात सध्या सर्व फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. अतिक्रमणाने विद्रुपीकरण केलेल्या या परिसरात या रंगवलेल्या भिंती किती आकर्षण ठरणार हा प्रश्नच आहे. नगरसेवकांनी भिंती रंगवण्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली होती तशी मागणी या अतिक्रमणांना हटवण्यासाठी केली तर पवईच्या सौंदर्यात मोठी भर नक्कीच पडेल, असे याबाबत बोलताना काही पवईकरांनी सांगितले.

पवई स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०

 

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!