ऐन गणेशोत्सवात पवईकरांचे पाणी पळवले; रविवारी विजेचे झटके

पाण्यासाठी नागरिकांची झालेली वणव

@रविराज शिंदे, रमेश कांबळे

गुरुवार पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामुळे सगळीकडे त्याची लगबग असतानाच पवईमधील जुनी पवई मानल्या जाणाऱ्या आयआयटी भागातील अनेक परिसरात शनिवारी आणि रविवारी पालिकेने कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय पाणी गुल केले. ही समस्या कमी होती की काय, रविवारी परिसरातील वीज सुद्धा गायब झाली. ऐन गणेशोत्सवात शनिवार – रविवारची सुट्टी गाठून आखलेल्या पवईकरांच्या नियोजनावरती यामुळे पाणी फिरले होते. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील पालिका ‘एस’ विभागांतर्गत येणाऱ्या पवई या बलाढ्य विभागात शनिवारी कोणतीही पूर्व सूचना न-देता पाणी आले नसल्याने रहिवाशांची चांगलीच तारांबळा उडाली. येथील अनेक डोंगराळ भागात असणाऱ्या घरांमध्ये पाणी साठपाच्या व्यवस्था नाहीत. दररोज येणाऱ्या पाण्यावरच त्यांचे पुढचे नियोजन निर्भर करत असते. अशात पाणी न-येण्यामुळे पाण्याअभावी नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागला.

पवईत शनिवारपासून जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. शनिवारी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता, तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने काही भागात अपुरा तर काही भागात दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा झाला नसल्याने पवईकर चांगलेच त्रस्त झाले होते.

पाणी न-आल्याने हातात हंडे, कळश्या घेवून पोरा-सोरांसकट सगळे विविध ठिकाणी पाण्याच्या शोधात भटकत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. काही नागरिकांनी वाहनांमधून शेजारच्या परिसरात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्याकडून पाणी भरून आणून त्या दिवशी कशीबशी आपली पाण्याची गरज भागवली होती.

दुरुस्तीचे सुरु असणारे काम

‘पालिकेने याची पूर्व सूचना देणे आवश्यक होते आम्ही पाणी साठ्पाचे काहीतरी नियोजन केले असते. आता आम्ही अंघोळी करायला आणि शौचाला यांच्या घरी जायचे का?’ अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.

जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपले हात झाडत पाणी येणार नसल्याची पूर्व सूचना सोशल माध्यमातून जनतेला दिली असल्याचे सांगितले.

त्यात भर म्हणून रविवारी सकाळी येथील अनेक भागात वीजपुरवठा सुद्धा खंडित करण्यात आला होता. २ तास शोधाशोध आणि पाठपुराव्यानंतर वीजपुरवठा करणाऱ्या संस्थेने गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना केलेल्या वीजपुरवठ्यामुळे दबाव निर्माण होऊन मानसरोवर इमारतीजवळ शॉर्टसर्किट निर्माण झाल्याचे उत्तर देवून लवकरच पुरवठा व्यवस्थित करतो म्हणून सांगितले. मात्र संपूर्ण दिवस विनावीज काढल्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास परिसरात वीज परतली.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!