फिल्टरपाडा येथे जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

@अविनाश हजारे

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी विहार तलावाची मुख्य जलवाहिनी पवई, फिल्टरपाडा येथे फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून वाहिनी फुटल्याची तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेला देवून सुद्धा पालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या मुंबईकरांना सतावण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी जवळपास सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. यापैकी विहार तलाव भागातून मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पवईमधील फिल्टरपाडा भागात फुटली आहे. त्यातून मोठ्या दाबाने मुबलक प्रमाणात पाणी वाहून परिसरात पाणी साठून तळ्याचे स्वरुप आले आहे.

पालिकेकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे गेल्या १५ दिवसात लाखो लिटर पाणी व्यर्थ वाया गेले असल्याचे सांगत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. “कहर म्हणजे वारंवार पालिकेला कळवून सुद्धा अद्यापही पालिकेचे अधिकारी इकडे फिरकले नाहीत.” ते जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी बोलताना स्थानिक नागरिकांनी केला.

पालिकेच्या या निष्काळजीपणाचा फटका मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना बसू शकतो अशी चिंता सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याबाबत पालिका एस वार्डमधील संबंधित विभागाशी संपर्क केला असता लवकरच योग्य ती दखल घेऊन फुटलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ हाती घेणार असल्याचे अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , ,

One Response to फिल्टरपाडा येथे जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

  1. Anjani Kumar Dwivedi March 12, 2018 at 5:50 pm #

    दुःखद

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!