पवई तलावाचे सौंदर्य संपवून सायकल ट्रॅक नको; पवई तलावातून सायकल ट्रॅक बांधकामाला निसर्गप्रेमींचा विरोध

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सायकल ट्रॅक बनवण्यासाठी पवई तलावात दगड आणि गाळ टाकणे पुन्हा सुरू करताच शनिवारी अनेक निसर्गप्रेमींनी शनिवारी गांधीगिरीच्या मार्गाने तर रविवारी परिसरातील प्रस्तावित सायकल ट्रॅकच्या विरोधात पवई तलावाजवळ जमा होत विरोध प्रदर्शन केले.

यावेळी पवईकरांसह मुंबईच्या विविध भागातील रहिवाशांनीही सायकल ट्रॅकचे पुढील बांधकाम थांबवण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन करण्यासाठी निदर्शनात भाग घेतला. ‘पवई तलाव वाचवा’, ‘पक्षी वाचवा’ असा संदेश असलेले फलक हातात धरत लहान मुलांनीही यात सहभाग घेतला.

यावेळी मुंबईच्या विविध भागातील सायकलप्रेमींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पवई तलाव हे मुंबईला लाभलेले सौंदर्य आहे त्याला नष्ट करून सायकल ट्रॅक नको असे मतही यावेळी निसर्गप्रेमी आणि सायकल चालकांनी व्यक्त केले.

आंदोलकांचे म्हणणे आहे की, “सायकल ट्रॅकमुळे पर्यावरण आणि तलावाच्या निरोगी जैवविविधतेला ज्यात मगर आणि विविध पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे त्यांना बाधा येईल.

निसर्गप्रेमी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईच्या पर्यावरणाला वाचवण्यासाठी पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे.

तरुण पर्यावरण वाचवण्यासाठी पुढे येत आहेत हे चांगले आहे. सायकलप्रेमी देखील सायकल ट्रॅकच्या विरोधात आहेत कारण ते पर्यावरणासाठी चांगले नाही हे असे दर्शवते की कोणालाच निसर्गाला हानी पोहचवून सायकल ट्रॅक नको आहे, असे मतही यावेळी पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले.

“पवई तलावात या मार्गाच्या निर्मितीसाठी मोठमोठाले दगड आणि डेब्रिज टाकली जात आहे. त्यामुळे पवई तलावाचे क्षेत्रफळ अजूनच कमी होणार आहे. यामुळे पवई तलावाची पाणीसाठा करण्याची क्षमता कमी होत छोट्याशा पावसानंतर तलाव ओव्हरफ्लो होत पूरस्थिती निर्माण होईल.” असे याबाबत बोलताना पर्यावरणप्रेमी अमिता भट्टाचार्य म्हणाल्या.

“तलावात असणारे मगर, मासे आणि इतर जीवांवर सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे त्वरित बंद होणे आवश्यक आहे.” असे मत यावेळी पवईकर पर्यावरण प्रेमी सोनाली मिश्रा यांनी व्यक्त केले.

प्रस्तावित सायकल ट्रॅक बनत असलेल्या भागात काही झाडांच्या फांद्या तोडल्याच्या, तसेच काही झाडांवर नंबर टाकण्यात आले आहेत याबद्दल कोणतीच माहिती कंत्राटदार किंवा प्रशासन स्पष्टपणे देत नाहीये. त्यामुळे सर्व स्पष्ट होईपर्यंत काम थांबवावे असे आवाहन आंदोलकांनी केले.

पवई तलावातून प्रस्तावित असलेला सायकल ट्रॅक पर्यावरणाला धोका पोहोचवत आहे, त्यामुळे हे काम ताबडतोब थांबवावे. त्याच्या पर्यावरणीय प्रभावाच्या मूल्यांकना संदर्भातील अहवाल लोकांसमोर आणावा. अशी मागणी सातत्याने पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. सदर कामाची कोणतीच स्पष्ट माहिती दिली जात नसून, ही माहिती स्पष्ट होईपर्यंत या कामाला पुढे चालू ठेवू नये, असे सांगत पवई तलावासाठी भराव सुरू असलेल्या रस्त्यावर पर्यावरणप्रेमींनी शनिवारी आंदोलन केले. रविवारी सायकलप्रेमींनी आणि मुंबईकर निसर्गप्रेमींनी या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवत पवई तलाव वाचवण्याचा नारा दिला.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!