अस्मानी संकट; पवई, चांदिवली भागात दिवसभरात काय घडले?

उशिराने एन्ट्री घेतलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांची चांगलीच धुलाई केली आहे. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मुंबईवर अस्मानी संकट कोसळले असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मुसळधार पावसामुळे साकीनाका, चांदीवली, आयआयटी पवई परिसरातील अनेक घरात पाणी भरल्याने स्थानिकांच्या घरातील किंमती वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले  आहे.

मुंबईत गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जून महिन्यातील पावसाचा कोटा पूर्ण केला आहे. शनिवारी पासून मुंबईत २३४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. २०१५ नंतर मुंबईत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी १९ जून २०१५ रोजी मुंबईत २८३.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.

मुंबईत झालेल्या या मुसळधार पावसाचा परिणाम चांदिवली आणि पवई भागात सुद्धा जाणवला. आज दिवसभरात या भागांमध्ये काय घडले याचा आवर्तन पवईने घेतलेला हा आढावा.

चांदिवलीतील संघर्षनगरमध्ये रस्ता खचला

चांदिवली, संघर्षनगर इमारत क्रमांक १० जवळ काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन आणि रस्ता खचल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या एका नामांकित विकासकाच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी हा संपूर्ण भाग पडला. सुदैवाने बांधकाम बंद असल्याने जीवितहानी टळली. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दल आणि साकीनाका पोलिसांनी परिसरातील वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ बंद करून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. घटनास्थळा शेजारच्या इमारतींना असणारा धोका पाहता येथील ३ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून, त्यातील रहिवाशांना तात्पुरते दुसरीकडे हलवण्यात आले आहे.

मात्र काही नागरिकांनी आपले घर सोडून जाण्यास मनाई केली आहे. आम्ही वारंवार तक्रारी करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणूनबुजून आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. दोषी विकासकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी याबाबत केली आहे.

विकासक, पोलीस आणि राजकीय प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत रस्ता पुन्हा बनवण्यात येईपर्यंत स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना विकासकाने कराव्यात असा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे याबाबत राजकीय प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे.

साकीनाका पोलीस ठाण्यात घुसले पावसाचे पाणी

मुंबईचा कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या मुंबई पोलिसांना आपल्या कामाच्या व्यापातून आपल्या स्वतःच्या जीवनात लक्ष द्यायला वेळ उरत नसतो. साकीनाका पोलीस ठाण्यात या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येक वर्षी पहावयास मिळत असतो. गेल्या चार दिवसात पडलेल्या पाऊसामुळे साकीनाका पोलीस ठाण्यात गुडघ्यापर्यंत पाणी साचले. यामुळे पोलिसांची चांगलीच दैना उडाली.

पवई तलाव भरून, ओसंडून वाहू लागला

मुसळधार पावसामुळे मध्यरात्री पवई तलाव भरला असून, मुंबईकरांचे आकर्षण असणारे पवई तलाव धरण ओसंडून वाहू लागले आहे. लोकांची भिजण्यासाठी येणारी झुंबड आणि गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांना पाहता लोकांच्या सुरक्षेसाठी तलाव भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तलाव क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत, मंगळवारी मध्यरात्री पासूनच पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे.

यावर्षी पावसाने उशिरा एन्ट्री घेतल्याने पवई तलाव भरण्यास जुलै महिन्याचा शेवट किंवा ऑगस्ट महिनाच उजाडणार अशी चिंता पर्यटन प्रेमी व्यक्त करत होते. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच तलाव ओसंडून वाहू लागल्याने त्यांच्यात आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे २०१६ साली सुद्धा जुलै महिन्याच्या २ तारखेलाच तलाव भरून वाहू लागला होता.

पर्यावरण प्रेमींची नाराजी

पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंद असला तरी पर्यावरण प्रेमी मात्र नाराज आहेत. जोरदार पावसानंतरही ऑगस्ट महिन्यात भरून वाहणारा तलाव गेल्या काही वर्षात जून – जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो होत आहे. तलावाची पातळी खालावत जावून, तलावात होणाऱ्या दुष्परिणामामुळे केवळ सुरुवातीच्या पावसातच तो ओसंडून वाहू लागला आहे, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

करोडो रुपये खर्च करून पवई तलावातील जलपर्णी हटवणे, गाळ उपसण्याचे काम करण्यात आले आहे. अजूनही नवनवीन कामे सुरु आहेत प्रत्यक्षात मात्र यातील कोणतीच कामे झाली नसून, उलट तलावाची पातळी अजूनच कमी झाली आहे आणि त्यामुळे थोड्या पावसातही तलाव ओव्हरफ्लो होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

हिरानंदानी, ग्लेन गेट येथे पावसामुळे झाड उन्मळून पडले

पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड होत असताना पवईतील हिरानंदानी भागात ग्लेन गेट येथे डॉग पार्कजवळ फॉरेस्ट स्ट्रीटवर असणारे एक भलंमोठं झाड पहाटेच्या वेळेस उन्मळून पडले. फुटपाथ आणि गटरलाईनला लागून असणारे हे झाड आसपासच्या भागातील पेवर ब्लॉक उखडत, पार्कच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या कुंपणावर पडल्याने त्याचेही नुकसान झाले आहे.

गटर निर्मितीच्या काळात झाडाजवळील भाग पोखरला गेला आहे. गटारातून वाहणारे पाणी आणि वरून डोंगराळ भागातून रस्त्यावरून येणाऱ्या पाण्याच्या दबावामुळे जमीन कमकुवत झाल्याने हे झाड पडले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

इंदिरानगर येथील डोंगराळ भागातील दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे रस्ते, झाडे आणि भिंती पडण्याच्या घटना घडत असतानाच आयआयटी पवईमधील इंदिरानगर येथील भागातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची घटना सुद्धा घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा येथील बॉम्बे पब्लिक स्कूलच्या पाठीमागील भागात गल्लीत शेजारीच असणाऱ्या डोंगरावरील दरडीचा भाग कोसळून रस्ता बंद झाला. विशेष म्हणजे नुकतेच या भागात लादिकरण करण्यात आले होते आणि लाखो रुपये खर्च करून कचरा उचलण्यात आला होता. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारचे घराचे नुकसान किंवा जीवित हानी झालेली नाही.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes