याचे श्रेय आता कोण घेणार? – पवईकर

पवईतील हिरानंदानी – पवई विहार रोडला जोडणाऱ्या विजय विहार रोडच्या दुरुस्तीनंतर याचे श्रेय घेण्यासाठी पोस्टर, बॅनर आणि सोशल माध्यमातून लोकप्रतिनिधींमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला होता. मात्र, या श्रेयवादाला आठवडा उलटायच्या आधीच विजय विहार रोडवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानेच या रस्त्याची दुर्दशा करत रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ते अशी याची अवस्था केली. दुरुस्तीचे श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधीनी मात्र या विषयात मौन धारण करत दुरुस्तीसाठी कोणतीच पाऊले उचलली नसल्यामुळे, आता या रोडच्या दुर्दशेचे श्रेय कुणाचे? असा प्रश्न पवईकरांना पडला आहे.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्व तयारी म्हणून रस्ते, नाले, गटारे यांच्या कामांना वेग येतो. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मुंबईकरांना किमान समस्यांना सामोरे जावे लागत असते. मात्र पवईतील विजय विहार कॉम्प्लेक्स समोरील रोड याला पूर्णपणे अपवाद आहे. या मार्गावरून उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सगळ्याच ऋतूत लोकांना खड्यातूनच त्रासदायक प्रवास करावा लागत असतो. कारण हा मार्ग खाजगी मालकीत असून, लवादातील रस्ता असल्याने पालिका येथे काम करू शकत नाही.

पवई विहार आणि लेकहोम या दोन मोठ्या कॉम्प्लेक्सना जोडताना, जेव्हीएलआर किंवा हिरानंदानीकडून येणाऱ्या वाहनांना हा एकमेव पर्याय असल्याने, अति महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीपेक्षा पुनर्निर्मितीसाठी कायमस्वरूपी तोडगा शोधण्याची मागणी स्थानिकांकडून होत असते.

४ जूनला स्थानिक आमदार अरिफ (नसिम ) खान यांनी मनपा “एस” विभागाचे सहाय्यक अभियंता भरत केदारे आणि दुय्यम अभियंता सोनार यांच्यासोबत या परिसराची पाहणी केली होती. या रस्त्याला ६३के अंतर्गत घोषित करून रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित करण्याची लेखी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली होती.

स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी मात्र खान यांच्या दाव्याला नाकारत, मे महिन्यात २४ तारखेला पालिकेला विजय विहार समोरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र दिले होते आणि याच मागणीनुसार पालिकेतर्फे हे काम केले जात असल्याचे सांगितले होते.

९ जूनला रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची सुरुवात झाल्यानंतर, ‘विजय विहार, पवई विहार व जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम आपल्या विभागाचे लाडके आमदार मो. अरिफ (नसिम) खान यांच्या अथक प्रयत्नाने करण्यात येत आहे. विभागातील सर्व रहिवाशांतर्फे जाहीर आभार’ अशा संदेशाचा बॅनर्स चांदिवली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विजय विहार समोर लावण्यात आला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल माध्यमातून काम चालू असणाऱ्या ठिकाणापासून लाईव्ह करत हे काम नगरसेवकांच्या प्रयत्नातून होत असल्याचा दावा केला होता. यानंतर सोशल माध्यमातून हा श्रेयवाद चांगलाच रंगला होता.

“आम्ही लोक प्रतिनिधींना जनतेच्या सेवेसाठीच निवडून दिलेले असते. एखाद्या जनसेवेच्या कामाचे श्रेय लाटत बसण्या पेक्षा आपल्या परिसराच्या प्रगतीसाठी त्यांनी सतत काम करणे आम्हा मतदारांना जास्त आवश्यक वाटते. दुरुस्तीच्या वेळी हे काम आम्हीच केले आहे असा दावा करणारे लोकप्रतिनिधी या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात होताच मात्र गायब झाले आहेत. मग आता या खड्डयांचे नक्की श्रेय कोणाचे?” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल पवईकर सोशलमाध्यमातून काय म्हणतात ?

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!