विंग कमांडर दिपक साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर ८ ऑगस्टला झालेल्या विमान दुर्घटनेत १९० प्रवाशांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पावलेले विमानाचे कॅप्टन (विंग कमांडर) दिपक साठे यांच्यावर आज (मंगळवारी) विक्रोळीतील हिंदू स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने प्रेरणादायी इतिहास रचल्याबद्दल चांदिवली नहार येथील त्यांच्या राहत्या घरी भारतीय वायुसेना आणि मुंबई पोलीस दल यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली. रहिवाशी आणि मित्र परिवाराकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

८ ऑगस्टला एअर इंडियाच्या एका विमानाचा केरळ येथील करिपूर विमानतळावर अपघात झाला होता. या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चांदिवली येथील रहिवाशी आणि विमानाचे मुख्य वैमानिक दिपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. चांदिवलीतील नहार कॉम्प्लेक्समधील झेनिया इमारतीत ते आपल्या परिवारासह राहत होते. कोरोनाव्हायरस (साथीच्या रोगाचा) आजाराच्या पार्श्वभूमीवर हे विमान ‘वंदे भारत’ कार्यक्रमाचा एक भाग होते, जे परदेशातून भारतीयांना परत आणण्याचे काम करत होते. दुबई – कोझिकोड एअर इंडिया एक्सप्रेस विमान करिपूर विमानतळाच्या रनवे नंबर १०वर उतरल्यानंतर दरीत कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले होते.

स्वॉर्ड ऑफ ऑनर

भारतीय वायुसेनेतून विंग कमांडर म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले होते. नॅशनल डिफेन्स अकॅडमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. १२७ पायलट कोर्सचा भाग असणाऱ्या साठे यांना दुंडीगलच्या एअर फोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये कोर्समध्ये टॉप केल्याबद्दल ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ (मानाची तलवार) देण्यात आली होती.

अपघातानंतर रविवारी त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या चांदिवली येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी भारतीय वायुसेना आणि मुंबई पोलीस दल यांच्यातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. सेनादलासह इतर क्षेत्रातील सहकारी, मित्र, आप्तेष्ट यांनी सुद्धा यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कोरोना महामारीचा विचार करता रहिवाशांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आल्याने इमारतीच्या भागात गाडीतून पार्थिव फिरवण्यात आले. यावेळी रहिवाशांनी आपल्या बाल्कनी आणि इमारतीच्या भागातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

विक्रोळी कन्नमवार नगर येथील स्मशानभूमीत बंदुकीच्या ३ फैरीची सलामी देत मुंबई पोलिसांतर्फे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

साठे हे कौटुंबिक व्यक्तिमत्व होते. ते एक चांगले पती आणि पिताही होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. या कठीण प्रसंगी एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो, भारतीय वायुसेना आणि नहार येथील रहिवाशी आणि संघटनांनी या कठीण काळात केलेल्या सर्व सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. असे याबाबत बोलताना त्यांच्या पत्नी आणि मुलांनी म्हटले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!