पवईकरांच्या साथीने प्राणी मित्रांनी वाचवले घार, कोब्रा व धामणीचे प्राण

@सुषमा चव्हाण

पाठीमागील आठवड्यात चांदिवली म्हाडा कॉलनी येथे उष्माघाताने जखमी पडलेली घार आणि पवई विसर्जन घाटावर विसाव्याच्या शोधात रस्त्यांवर आलेल्या कोब्रा व धामणीचे प्राण पवईकरांच्या मदतीने प्राणी मित्रांनी वाचवले. अम्मा केअर फाऊंडेशन (ACF) आणि प्राणी मित्र संघटना पॉज मुंबई (PAWS) यांनी बचाव करून निसर्गाच्या सानिध्यात त्यांना परत सोडले आहे.

चांदिवली म्हाडा कॉलनी येथील रहिवासी राहूल रनाळकर यांना आपल्या इमारतीजवळ एक घार शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे जखमी अवस्थेत आढळून आली होती. याबाबत त्यांनी अम्मा केअर फाऊंडेशन यांना माहिती दिल्यानंतर, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेत घारीचा बचाव करत, उपचार करून तिला उंच भरारी घेण्यासाठी मुक्त केले आहे.

रिक्षाचालक योगेश लोखंडे हे आदिशंकराचार्य मार्गावरून प्रवास करत असताना गणेशनगर गणेशघाट येथील रस्त्याच्या कडेला फुटपाथवर आयआयटीच्या दिशेने एक भला मोठा कोब्रा दिसून आला. ज्याची माहिती त्यांनी त्वरित पॉज संघटनेला दिली.

“योगेशला आम्ही तिथे पोहचेपर्यंत त्या सापावर सुरक्षित अंतर ठेवत लक्ष ठेवण्यास सांगितले. विषारी कोब्र्याला आम्ही सुरक्षितरित्या वाचवले असतानाच, काही लोकांनी कबुतरखाना जवळ एक धामण पाहिली असल्याचे सांगितले. तिला देखील आम्ही सुरक्षितरित्या ताब्यात घेत वनविभागाला याची माहिती देवून कोब्रा आणि धामण यांना नैसर्गिक वातावरणात मुक्त केले आहे,” असे पॉज मुंबईचे सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, “या वर्षीचा उन्हाळा अधिक कडक असून, मुंबईकरांना कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. उन्हाचा त्रास माणसांप्रमाणे प्राणी आणि पक्षी यांनाही होत असतो. अनेक प्राणी आणि पक्षी दरवर्षी पाण्याविना मरत असतात. आपल्या बाल्कनी, खिडक्या, उद्याने, कार्यालये आणि दुकानांबाहेर भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यांचा जीव वाचवू शकता. तुमच्या छोट्याशा मदतीने खूप काही बदल घडू शकतो”.

उन्हाळ्यामध्ये पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी यांना पाण्यावाचून खूप त्रास होत असतो. एखादा साप आढळून आल्यास त्याला मारू नका, तसेच जखमी अवस्थेत प्राणी, पक्षी दिसून आल्यास आमच्याशी संपर्क साधा असे आवाहनही निशा कुंजू यांनी केले.

प्राणीमित्र कुंजू यांनी उन्हाळ्यासाठी दिलेल्या काही टिप्स:

१. कार, स्कूटर, टेम्पो, ट्रक इत्यादीसारख्या वाहनांच्या थंड जागी कुत्री आणि मांजरी विसावा घेत असतात, वाहने चालू करण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्या.

२. प्राणी पक्ष्यांसाठी बाल्कनी, खिडक्या, उद्याने, कार्यालये आणि दुकानांबाहेर भांड्यामध्ये पाणी ठेवा. शक्यतो दररोज त्यातील पाणी बदला.

३. जखमी अवस्थेत प्राणी, पक्षी आढळून आल्यास प्राणी मित्रांशी संपर्क साधा.

४. आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. त्यांच्या आहारावर लक्ष ठेवा. प्रखर उन्हापासून त्यांचा बचाव करा. पाळीव कुत्र्यांना अधूनमधून पोहायला घेऊन जा.


पॉज मुंबईला आपण ९८९२१७९५४२ किंवा ९८३३४८०३८८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!