चांदिवली – हिरानंदानीला जोडणाऱ्या नवीन ६० फुटी रोडच्या कामाला सुरुवात

चांदिवली आणि हिरानंदानी कॉम्प्लेक्स भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. या दोन विभागांना जोडणारा पंचश्रुष्टी आणि जेविएलआर, रामबाग मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र यातील पंचश्रुष्टी मार्गावर खराब रस्त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी असते, तर जेविएलआर, रामबाग मार्गे फिरून जाणे खूप लांब पल्ल्याचे पडते. मात्र, आता या परिसरात राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. चांदिवलीहिरानंदानी जोडणाऱ्या मार्गाचे निर्मितीचे काम सुरु झाले असून, लवकरच हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

पवई आणि चांदिवली परिसराचा दिवसेंदिवस होणारा विकास पाहता या परिसराला जोडणाऱ्या मार्गिकेची गरज गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना जाणवत होती. पंचश्रुष्टी परिसरातून जाणारा मार्ग हा सध्या उपलब्ध असला तरी या मार्गावर येणाऱ्या वाहतुकीच्या दबावामुळे वाहतूक कोंडी निर्माण होवून, याचा परिणाम चांदिवली आणि हिरानंदानी परिसरातील इतर मार्गांवर सुद्धा पडत असतो. बृहन्मुंबई महानगरपालिका विकास आराखड्यात पर्यायी मार्गाची तरतूद दाखवण्यात आली असतानाही गेली अनेक वर्ष मंजुरीच्या विळख्यात तो अडकून पडलेला होता. अखेर स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी पाठपुरावा करत पालिकेतर्फे या रस्त्याच्या कामाची सुरुवात केली आहे.

यासंदर्भात ‘आवर्तन पवई’शी बोलताना आमदार लांडे यांनी सांगितले की, “चांदिवली आणि हिरानंदानी परिसराला जोडणाऱ्या या मार्गावर वाहतुकीचा मोठा दबाव आहे. म्हणूनच मी पाठपुरावा करत या दोघांना जोडणाऱ्या ६० फुटी मार्गाची मंजुरी मिळवली आहे. खैरानी रोड येथून येणारा हा मार्ग डीमार्ट येथून, विसिनिया (शापूरजी पालूनजी), संघर्षनगर जामा मश्जीद, पवार पब्लिक स्कूल मार्गे हिरानंदानी परिसराला जोडणार आहे. या मार्गाच्या निर्मितीचे काम सुरु झाले आहे.”

चांदिवली येथील डी-मार्ट येथून या कामाची सुरुवात झाली असून, शापूरजी पालूनजी यांच्या विसिनिया प्रोजेक्ट पर्यंत रस्त्याच्या खोदकामाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच हिरानंदानी एसईझेडकडून हिरानंदानी न्यू स्कूलजवळ रस्ता खोदकाम पूर्ण झाले आहे. उरलेल्या भागातील आवश्यक त्या पूर्तता करून लवकरच या संपूर्ण रस्त्याच्या बांधकामाची सुरुवात पालिकेतर्फे केली जाणार आहे.

, , , , , , , , , ,

Trackbacks/Pingbacks

  1. ऑनलाईन हॉलिडे व्हिला बुकिंगच्या नावावर फसवणूक » आवर्तन पवई - February 19, 2021

    […] हे वाचलेत का? चांदिवली – हिरानंदानील… […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!