चांदिवलीची पूर्ण कोंडी, शिवभक्तानी रोड दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

अतिक्रमणयुक्त आणि खोदलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्यास भाग पाडून चांदिवलीकरांची आधीच प्रशासनाने कोंडी केली आहे. आता त्यात भर म्हणून शिवभक्तानी रोडच्या कामाला सुरुवात करून चांदिवलीला पूर्ण कोंडीत टाकण्यात आले आहे. पश्मीना हिल ते गुंडेचा हिल या भागात आता खोदकाम सुरु करण्यात आले असून, यामुळे जायचे तर जायचे कुठून? असा प्रश्न चांदिवलीकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना पडला आहे.

हिरानंदानी आणि चांदिवलीला जोडणारा चांदिवली फार्म रोड, शिवभक्तांनी रोड मार्गे हा एकमेव दुवा सध्या उपलब्ध आहे. मात्र यातील चांदिवली फार्म रोडवर शिवाजी महाराज चौक ते पश्मीना हिल भागात पाठीमागील अडीच महिन्यापासून रस्ता बनवण्याचे काम सुरु असून, या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. केवळ मोटारसायकलला येथून प्रवेश आहे. मात्र तो ही येथे खोदलेल्या रस्त्यांमध्ये पडून दुखापत होण्याच्या भीतीने जीव मुठीत घेवून. बाकी वाहनांना डी पी रोड ९ मार्गे रामबाग, जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड आणि एनटीपीसी सिग्नल मार्गे जलवायू आणि हिरानंदानी असा प्रवास करावा लागतो.

चांदिवलीत नहार अमृतशक्ती, रहेजाविहार, लेकहोम, विसिनिया, लोकमिलन, टाटा सिम्फनी, सिंक्रोनीसिटी, म्हाडा वसाहत असा अनेक मोठ्या वसाहती वसलेल्या आहेत. मात्र हा परिसर हळूहळू वाढत असताना या परिसराला रोडच्या उपलब्धता तेवढ्याच कमी होत आहेत. यातील लेकहोम वगळता इतर सर्व वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आणि इतर भागातून चांदिवली, पवई भागात कामानिमित्त येणाऱ्या मुंबईकरांना चांदिवली फार्म रोड आणि डीपी रोड ९ एवढेच काय ते पर्याय आहेत.

शिवाजी महाराज चौक ते पश्मीना हिल रोडच्या कामाच्या वेळेस वाहतूक डीपी रोड ९ आणि संघर्षनगर येथून वळवण्यात आली होती. मात्र काही दिवसातच येथील मुख्य प्रवेश रस्ता दुरुस्तीसाठी खोदल्याने प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली होती. तरीही चांदिवलीकर उपलब्ध सुविधेचा उपयोग करत वाहतूक कोंडीत अडकून कसाबसा प्रवास करत होते. मात्र आता शिवभक्तांनी रोडच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करून त्यात आणखी भर टाकण्याचे काम पालिका प्रशासनाकडून केल्याचा आरोप चांदिवलीकर करत आहेत.

“पालिका रस्ते बनवते आहे चांगलीच गोष्ट आहे. मात्र त्यांचे नियोजन मात्र खूप चुकीचे आहे. नागरिकांची कोंडी होणार नाही अशा पद्दतीने काम करणे अपेक्षित आहे. मात्र पालिका एल विभागाने चांदिवलीचे सगळेच रस्ते खोदून चांदिवलीला पूर्ण कोंडीत पकडण्याचा चंग बांधलेला दिसत आहे.” असे एका चांदिवलीकराने सांगितले.

यासंदर्भात बोलताना चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनचे मनदीप सिंग म्हणाले, “चांदिवलीच्या रस्त्यांवर आणि फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणाबद्दल आम्ही पालिकेला सर्वतोपरी पाठपुरावा करत आहोत. चांदिवलीला साकीनाका आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडशी (जेविएलआर) जोडणारे मार्ग कमी असून, नियोजनात असलेल्या विकास आराखड्यातील ९० फुटी रस्त्याचे काम सुरु करून लवकरात लवकर चांदिवलीला किमान जेविएलआरशी जोडावे अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. डीपी रोड ९च्या दुरुस्तीच्या कामाचे टेंडर डिसेंबरमध्ये काढण्यात आले आहे मात्र तिथेही काहीच हालचाल दिसत नाही.

“शिवभक्तांनी रोड ते शिवाजी चौक हा संपूर्ण रस्ता एकाच मंजुरीचा भाग आहे. टप्प्या टप्प्यात आम्ही या संपूर्ण रोडवर काम करत आहोत. पश्मीना हिल ते गुंडेचा हिल या भागात केवळ एका बाजूचा रस्ता सध्या आम्ही खोदून त्यावर काम करत आहोत. दुसऱ्या बाजूचा रस्ता आम्ही वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे. हलकी वाहने या भागातून नक्की प्रवास करू शकतील,” असे याबाबत बोलताना येथील सुपरवायझरने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: