लैंगिक छळाच्या आरोपाखाली तरुणाचे अपहरण करून लुटले

बहिणीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली पवईत तीन अज्ञात इसमांनी एका २६ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून लुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करीत पवई पोलिसांच्या हद्दीत तीन अज्ञात इसमांनी एका २६ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू लुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पवई पोलिसांनी याबाबत जबरी चोरीच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

साकीनाका येथील एका आर्थिक सेवा कंपनीमध्ये तक्रारदार सुनील पाटील सहाय्यक म्हणून काम करतात. “२२ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास आपली शिफ्ट संपवून घरी जात असताना एक ऑटोरिक्षा त्यांच्या समोर येऊन थांबली.

ऑटोमध्ये तीन लोक बसले होते. त्यातील दोन प्रवासी सीटवर तर एक चालकाच्या शेजारी बसला होता. प्रवासी सीटवर बसलेले दोन इसम खाली आले आणि त्यांनी मला सांगितले की, मी त्यांच्या बहिणीचा छळ करणार्‍या व्यक्तीसारखा दिसत आहे. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर यावे व तिच्याकडे माफी मागावी असे त्यांनी मला सांगितले, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात पाटील यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, मी काही म्हणण्यापूर्वीच त्यांनी मला रिक्षात ढकलले आणि ड्रायव्हरला गाडी चालवण्यास सांगितले. मी तो नसून, त्यांची चूक झाल्याचे पटवून देण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. घाटकोपरमध्ये पोहचल्यावर एकाने जबरदस्तीने माझी गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली.

“यावेळी पुढे बसलेल्या इसमाने पाटीलला उतरून आपल्याबरोबर चालण्यास सांगितले. दरम्यान इतर दोघांना घेवून ऑटोरिक्षा तिथून निघून गेली,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

“खाली उतरलेल्या इसमाने पाटील यांचा मोबाईल हिसकावून घेत आपल्या बहिणीला घेवून येईपर्यंत तेथेच उभे राहण्याचे आदेश देत तो निघून गेला. तासभर घटनास्थळी थांबल्यानंतर फिर्यादी तेथून निघून गेले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली, असेही यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा पवई पोलिसांच्या हद्दीत घडला असल्यामुळे त्यानंतर पवई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

“भादवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास करत आहोत”, असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!