सोशल मिडियावर तरुणीची ‘फेक प्रोफाईल’ बनवणाऱ्या तरुणाला कलकत्तामधून अटक

पवईतील हिरानंदानी येथील टीसीएस कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची फेक (खोटी) प्रोफाईल बनवून, ओळख चोरीचा गुन्हा करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय शॉ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कलकत्ता येथील २४ परगणा भागच आहे.

सोशल माध्यमे सध्याच्या युगात तरुणांची मुलभूत गरज होऊन बसली आहेत. यामाध्यमात अकाऊंट नाही असा तरुण सापडणेच मुश्कील. मात्र कधी कधी या सोशल माध्यमात गंमत म्हणून एखादे असे पाऊल उचलले जाते की त्यातून गुन्हा घडतोय हे वापरकर्त्याला सुद्धा कळत नाही. एकमेकांना कधीच न पाहता केवळ समोर दिसणाऱ्या फोटोंच्या आधारावर मैत्री आणि गप्पा रंगतात. यातच कळत नकळत गुन्हा घडतो. हातात बेड्या पडतात आणि मग कळते आपण काय करून बसलोय.

मूळची कलकत्ताच्या इच्छापूर येथील असणारी स्वाती भट्टाचार्य- २५ (बदलेले नाव) पवईतील हिरानंदानी येथील टीसीएस (TCS) कंपनीत नोकरीस आहे. मित्र बनवणाऱ्या सोशल मिडीया साईटवर तिचे एक प्रोफाईल आहे, ज्याच्यावरून ती आपल्या मित्रांच्या संपर्कात असते. एक दिवस तिच्या मित्रांनी तिला तिचा प्रोफाईल फोटो लावून रिया सेन गुप्ता नावाने कोणीतरी प्रोफाईल बनवली असल्याची माहिती दिली.

रियाची प्रोफाईल तपासली असता स्वातीचाच फोटो त्या प्रोफाईलवर ‘डीपी’ आणि कव्हर फोटो ठेवलेला होता. त्या प्रोफाईलवरून तिच्या मित्रांना आणि अजून काही लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा पाठवण्यात आल्याचे लक्षात येताच स्वातीने पवई पोलीस ठाण्यात ओळख चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

‘प्रोफाईल तयार करणारा आयपी अड्रेस आणि वापराचे ठिकाणाची टेक्निकल माहिती मिळवली असता कलकत्ता येथून रिया सेन गुप्ताचे अकाऊंट वापरले जात असल्याची माहिती मिळाली. खात्री करून घेत कलकत्ता येथून आम्ही अक्षय नामक तरुणाला या गुन्ह्यात अटक केली आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या सायबर सेलचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कोळपे यांनी सांगितले.

‘मुलांसोबत बोलताना मुलगी बनून बोलण्यासाठी गंमत म्हणून अक्षयने हे फेक अकाऊंट तयार केले होते’ असेही याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अक्षयला माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६- क (जर एखाद्या व्यक्तीणे दुसऱ्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती वापरणे/चोरी करणे) नुसार अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!