साकीनाका येथे वाहतूक पोलिसाच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; तिघांना अटक

ट्रिपल सीट जाताना अडवल्याचा राग मनात धरून एका वाहतूक पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याची घटना शनिवारी रात्री साकीनाका येथे घडली. याबाबत साकीनाका पोलिसांनी वयाच्या विशीत असणाऱ्या अब्दुल शेख, सद्दाम शेख आणि इसाक नामक तीन तरुणांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांवर होणारे हल्ले नवीन नसून, साकीनाका, पवई भागात गाडी चालकांची पोलिसांवर दादागिरी वाढली आहे. अनेकदा पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.

साकीनाका वाहतूक विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असणारे समिउल्ला भालदार यांना शनिवारी साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज येथे कर्तव्य देण्यात आले होते. यावेळी तीन तरुण एकाच गाडीवरून प्रवास करत वाहतूक नियम मोडत असल्याचे भालदार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ त्यांना थांबवले.

यावेळी “रस्ता तुझ्या बापाचा नाही” असे म्हणत तरुणांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि संधी साधत तेथून पळ काढला.

‘याचाच राग मनात धरून तरुणांनी पळून गेल्यानंतर जवळच असणाऱ्या एका दुकानातून मिरची पावडर खरेदी केली आणि परत भालदार उभे असणाऱ्या ठिकाणी येवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, त्यांना मारहाण करत तेथून पलायन केले’ असे याबाबत बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भालदार यांना रस्त्यावर पडल्याचे पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डोळ्याच्या डॉक्टरांकडे उपचार सुरु असून, ते कामावर हजर राहू शकले नाहीत.

रात्रीच्या वेळी घटना घडल्यामुळे घटनेच्या ठिकाणी अंधार होता. त्यातच तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने आरोपींचा शोध घेणे अवघड होते. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी मोटारसायकलचा पुसटसा नंबर पाहिला होता. सोबतच आरोपींच्या हातात लाल रंगाचा रुमाल असल्याची माहिती मिळाली होती. ज्यावरून खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जरीमरी भागातून अब्दुल शेख, सद्दाम शेख आणि इसाकला अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

साकीनाका पोलिसांनी भादवि कलम ३५३, ३३२ आणि ३४ नुसार गुन्हा नोंद करून, तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes