पवईमधील हिरानंदानी कॉम्प्लेक्स परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या जोडप्याच्या घरातून २३ लाख रुपयांच्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांच्या चोरीची घटना नुकतीच समोर आली आहे. येथील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात चोरीची घटना घडली आहे. तक्रारदार ८८ वर्षीय सविता भाटीया यांनी या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार गेल्या ३० वर्षांपासून आपल्या ९५ वर्षीय पतीसोबत पवईमधील हिरानंदानी कॉम्प्लेक्स भागात राहत आहेत. त्यांचा मुलगा अबू-धाबीमध्ये राहत असून, त्याला भेटायला अधूनमधून ते जातात. मुंबईत या दाम्पत्याने देखभाली आणि घरातील कामासाठी मेघा आणि अर्चना नामक दोन महिलांना मदतनीस ठेवले आहे.
पती परदेशात नोकरी करत असताना त्यांनी आपल्या पत्नीसाठी काही महागडे सोन्या-हिऱ्याचे दागिने खरेदी केले होते. हे दागिने नियमित वापराचे असल्याने तक्रारदार ते घरातील बेडरूममधील कपाटात असलेल्या लॉकरमध्ये ठेवत असत. ५ जानेवारीला बाहेर जाण्यापूर्वी सोन्याच्या बांगड्या काढायला मी गेले असता त्या लॉकरमध्ये मिळून आल्या नाहीत. त्यानंतर, ८ जानेवारी रोजी आपला हार आणि अंगठ्या घेण्यासाठी गेले असताना ते देखील लॉकरमधून गायब असल्याचे आढळले, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तक्रारदार यांनी म्हटले आहे.
घरभर शोध घेऊन आणि घरातील मदतनीसांची चौकशी करूनही, दाम्पत्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वाढलेले वय आणि पोलीस चौकशीच्या भीतीमुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधणे टाळले.
“१५ जानेवारी रोजी इमारतीचे सचिव त्यांना मतदानासाठी घेऊन जायला आले असता, त्यांनी त्यांना चोरीबद्दल माहिती दिली. त्यानंतर सचिव त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्यांच्या जवाबानुसार घरातील चोरीबद्दल भारतीय न्याय संहिता कलम ३०६ नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे,” असे पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले, “तक्रारीनुसार, चोरी झालेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये अंदाजे १० लाख रुपये किमतीच्या पाच सोन्याच्या बांगड्या, १० लाख रुपये किमतीचा हिऱ्यांनी जडवलेला सोन्याचा हार, १ लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि सुमारे २ लाख रुपये किमतीचे इतर सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे.”
याबाबत पवई पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही घरगुती नोकरांच्या हालचाली आणि ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान चोरी नेमकी कधी आणि कशी झाली, हे निश्चित करण्याचाही प्रयत्न करत आहेत. पुढील तपास सुरू आहे.



No comments yet.