सुषमा चव्हाण | [email protected]
लोकांचा मित्र, गुरु, मास्टर छायाचित्रकार, भाऊ, एक उत्तम मार्गदर्शक, छाया-पत्रकार, कलाकार अशी विविध विशेषणांनी ज्यांना संबोधले जाते, असे विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश त्रिवेदी उर्फ मुकी आणि सगळ्या पवईकरांचे लाडके दादा. लहानपणी शाळेत असताना चित्रकलेची आवड असणारा बाल-चित्रकार ते प्रख्यात छायाचित्रकार असा प्रवास करताना कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून सुद्धा लोकांच्या मनात घर करून राहिलेला हा पवईचा अवलिया.
एकेकाळी जंगल, डोंगराळ, खाणीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवईच्या गल्लीबोळात ते लहानाचे मोठे झाले. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या लहानग्या मित्रांसोबतच लहान थोर मंडळींना सुद्धा आपल्या प्रेमळ, मनमिळावू, गोड आणि सर्वात महत्वाचे बिनधास्त स्वभावाने मोहिनी घातली होती. कोणताही कार्यक्रम परिसरात असो वा नातेवाईकांच्यात हे नेहमी सगळ्यात पुढे असायचे.
शालेय जीवनात असताना त्यांच्या काकांनी आणलेला याशीकाचा कॅमेरा त्यांनी पहिल्यांदा हाती घेतला आणि फोटो काढायला सुरुवात केली. त्यांनी काढलेले फोटो नातेवाईकांना, मित्रमंडळीना खूप आवडायचे, त्यामुळे फोटो तिथे मुकेश असे समीकरणच झाले होते. इथेच त्यांच्या आतल्या छायाचित्रकाराला वाव मिळाला. सुरुवातीला नातेवाईकांच्यात फोटो काढणारे मुकेश हळूहळू मित्रमंडळी-परिसरात, कार्यक्रमात लोकांचे कॅमेरे घेऊन फोटो काढू लागले आणि ते एक लोकमान्य सर्वोत्तम छायाचित्रकार झाले.
कॅमेऱ्याची मन्युअल बुक्स आणि छायाचित्रणाची त्या काळात उपलब्ध होणारी पुस्तके वाचून त्यांनी परिसरात असणाऱ्या डॉक्टरांचा झेनीतचा ३५ एमएम कॅमेरा घेऊन त्यात रोल भरून नजरेला जे चांगले दिसेल ते टिपायला सुरवात केली. खर्चाला मिळणारे पैसे साठवून त्यातून रोल खरेदी करून विविध वेळेचे हजारो फोटो काढले, त्यातून शिकत हळूहळू सुंदर फोटो काढू लागले. आपण काढलेले फोटो अधिक सुंदर यावेत यासाठी त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला प्र
वेश घेतला, पण काही कारणाने परिक्षेलाच जाऊ शकले नाहीत, तेव्हा अजून एक वर्ष वाया घालवण्यापेक्षा त्यांनी दादर येथील नॅशनल इंस्टीटयूट ऑफ फोटोग्राफीमध्ये प्रवेश घेतला. देसाई सरांच्या रुपात भेटलेल्या गुरुंनी त्यांचे कलागुण ओळखून या हिऱ्याला चमकवले आणि त्यांच्या व्यावसाईक छायाचित्रकारच्या जीवनाला सुरवात झाली.
सुरवातीला ‘जे ६९’ नावाने फोटो स्टुडिओ सुरु करून त्यांनी आपल्या कलेत रंग भरायला सुरवात केली. पारंपारिक पद्धतीने फोटो काढण्यात गुंतून न राहता त्यांनी विविध पद्धतींचा अवलंब करून एक वेगळ्या नजरेतून छायाचित्र काढायला सुरवात केली. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळी वेग-वेगळ्या पद्धतीने कॅमेऱ्यात कैद केले गेले, त्यामुळे ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. मित्रमंडळीच्या लग्नात छायाचित्र काढता काढता ते पवईसह आसपासच्या परिसरात सुद्धा सगळ्यांना हवे हवेसे छायाचित्रकार झाले.
एकेदिवशी परिसरात घडलेल्या एका बातमीसाठी इंडियन एक्सप्रेसमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मित्रासाठी त्यांनी एक बोलके छायाचित्र काढले आणि त्यांना मुक्त छाया-पत्रकाराच्या रुपात इंडियन एक्सप्रेसने संधी दिली आणि या संधीचे त्यांनी सोने केले. काही वर्षातच मुंबईत नव्याने येत असलेल्या डीएनए वृत्तपत्रात त्यांना छाया-पत्रकार म्हणून नोकरी मिळाली आणि शब्दात बातमी सांगणाऱ्या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रातून लोकांना बातम्या सांगितल्या.
इनडोअर, आउटडोअर, दिन-छायाचित्रण, निशा-छायाचित्रण, गतीशील छायाचित्रण, निसर्ग छायाचित्रण, स्थापत्यचित्रण (विषेतः इमारत, वास्तू, कारखाना यांचे छायाचित्रण), सर्जनशील छायाचित्रण, प्रसंगचित्रण, सूक्ष्म छायाचित्रण, प्रवासचित्रण, वन्यजीवन छायाचित्रण, उत्पादन छायाचित्रण, व्यक्तिचित्रण, मॉडेल आणि फॅशन छायाचित्रण अशा विविध प्रकारच्या छायाचित्रणात यश संपादित केलेले मुकेश त्रिवेदी छाया-पत्रकारितेत सुद्धा चमकले.
कसबी छायाचित्रकार, प्रभावी व्यक्तिमत्त्व, तल्लख बुद्धी, अभिजात रसिक मन, गोड वाणी या गुणवैशिष्टयांमुळेच की काय विभिन्न क्षेत्रातील, विविध वयोगटातील, विविध विचारांची माणसं त्यांच्याशी सहजतेने, मोकळेपणाने संवाद साधू शकतात. फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय न मानता त्यांनी त्या क्षेत्रांत भरभक्कम कामे केली आणि बघता बघता ते मुंबईकरांचे लाडके छायाचित्रकार झाले. ते नेहमीच आपल्या संपर्कात येणा-या लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, ती व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे याचा वेध घेतात त्यामुळे ते सहजगत्या घरातील एक असे बनून जातात, त्यामुळे छायाचित्र काढताना सोपे जाते असे त्यांना वाटते.
छाया-पत्रकारितेत काही काळ नाव कमावल्यानंतर, छायाचित्रणाच्या क्षेत्रात वेगळे काहीतरी करायची इच्छा आणि अजूनही बरेच काही शिकण्याची आवड लक्षात घेता त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन आपला स्वतःचा असा एक मार्ग निवडला आहे. सध्या ते प्रवासचित्रण, जाहिरात, संस्कृती छायाचित्रण, माहितीपट, पाण्याखालील छायाचित्रण अशा विविध विषयांवर काम करत आहेत.
त्यांचा आयुष्यातला एक प्रसंग त्यांच्या मनात घर करून आहे ‘एका साखरपुड्याचे (एन्गेजमेंट) छायाचित्रण त्यांनी केले होते. काही दिवसांनी त्या क्षणांचा अल्बम त्यांनी पाठवून दिला आणि ते आपल्या प्रवासचित्रणासाठी परदेशी जाण्याच्या तयारीला लागले. जाण्यास काही दिवसच उरलेले असताना त्यांनी ज्या मुलीच्या साखरपुड्याचे छायाचित्रण केले होते तिच्या वडिलांचा फोन आला “आपण अमुक-तमुक तारखेला आमच्या इथे यायचे आहे आणि लग्नाचे छायाचित्रण करायचे आहे” असे सांगितले; परंतु मुकेशनी आपण परदेश दौऱ्यास निघणार असून शक्य नसल्याचे कळवले. तेव्हा त्यांनी सांगितले कि, “आम्ही आधी ठरवलेल्या सगळ्या फोटोग्राफरना नकार कळवला आहे. मुलगा आणि मुलगी दोघांनीही तुम्ही काढलेल्या फोटोंचे अल्बम पहिल्यानंतर त्यांना तुम्ही टिपलेले ते क्षण खूप आवडलेत आणि त्यांच्या लग्नातला प्रत्येक क्षण त्यांना तुमच्या पेक्षा सुंदर पद्धतीने कोणीच कैद करू शकणार नाही असा विश्वास आहे. तेव्हा दोन्ही पक्षातर्फे त्यांच्या लग्नाचे फोटो तुम्हीच काढायचे आहेत.
जर तुम्हाला वेळ नसेल तर लग्नाची तारीख बदला असे मुला-मुलीचे म्हणणे आहे आणि आता ते शक्य नाही. निमंत्रण गेली आहेत, सर्व तयारी झाली आहे तेव्हा तुम्हीच आम्हाला फोटोग्राफर म्हणून हवे आहात आणि ही आमची सर्वांची इच्छा आहे”. भावनेत गुंतलेल्या मुकेशनी आपला दौरा रद्द करून त्या जोडप्यांना त्यांच्या आयुष्यभर पुरतील असे क्षण कैद करून दिले आणि मगच ते आपल्या प्रवासचित्रणच्या दौऱ्यावर गेले.
छायाचित्रणाच्या क्षेत्रात २००४ सालचा सर्वोत्कृष्ठ छायाचित्रकार, बेस्ट लँन्डस्केप फोटोग्राफर, बेस्ट स्ट्रीट फोटोग्राफर, एनआयपी अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या केलेल्या आगळ्यावेगळ्या छायाचित्रणासाठी ‘नवी मुंबई पोलिस पुरस्काराने’ त्यांना सन्मानित करण्यात आले. हा सन्मान देताना नाना पाटेकर यांनी “तुझ्या सारख्या वेगळ्या विचाराच्या छायाचित्रकारांची समाजाला नितांत गरज आहे” असे गौरवास्पद उद्गार काढले होते. लोकांच्या चेहऱ्यावर दिसनारे समाधान हाच मुकेशना सर्वात मोठा पुरस्कार वाटतो.”
काहीच महिन्यापूर्वी त्यांनी छायाचित्रणाची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी फेसबुकच्या माध्यमातून छायाचित्रणाचे प्रशिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. ज्याद्वारे दररोज ते छायाचित्रणाच्या विविध अंगांचे मार्गदर्शन करत आहेत. मोठ्या प्रमाणात चाहते असणाऱ्या या गुरूंकडे अनेक छायाचित्रकार घडले असून आज ते आप-आपल्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून आहेत.
या अवलिया आपण [email protected] वर संपर्क करू शकता.
फेसबुक अकौंट: https://www.facebook.com/mukesh.trivedi
फेसबुकपेज: https://www.facebook.com/MukeshTrivediPhotography
Great Super Cool Mukesh Bhai